गुन्हेगारी संदर्भात नागरिकांनी आमच्याशी थेट संपर्क साधावा


उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्हयात चोरी, गांजा, गुटखा,मावा  अवैध धंदे मोठ्या प्रमाणात बोकाळले आहेत. त्यामुळे  जिल्हयातील जनतेला यापासून सुरक्षीत करण्यासाठी विशेष भर दिला जाणार आहे, त्याबरोबरच तुळजापुरात सर्वच प्रकारची गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी लक्ष केंद्रीत करणार असून कोणत्याही गुन्हेगारी संदर्भात नागरिकांनी थेट आमच्याशी संपर्क साधवा, असे आवाहन नूतन पोलिस अधिक्षक नीवा जैन यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दि. २७ सप्टेंबर रोजी केले. 

जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक नवनीतकुमार काँवत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन घाडगे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना जैन म्हणाल्या की, जनता व पोलिसांमध्ये सुसंवाद वाढावा, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, तसेच आगामी काळात येणारा तुळजाभवानीचा नवरात्र उत्सव शांततेत पार पाडावा, यासाठी जनतेने शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.या ठिकाणी महाराष्ट्रासह इतर राज्यातील भाविक येत असताना कोरोनाचे दोन डोस घेणे आवश्यक आहे.कारण आपल्यामुळे इतर भाविकांना कोरोना विषाणूचा धोका वाढू नये, याची काळजी व पुरेर खबरदारी घ्यावी, असे सांगून त्या म्हणाल्या की, या ठिकाणी बंदोबस्तांवर असणारे, पोलिस अधिकारी, कर्मचारी देखील कोरोनाच्या दोन लसी घेऊनच बंदोबस्तावर तैनात होणार आहेत. तर जिल्हयातील १ हजार ७६८ पोलिसांपैकी १ हजार ६०० पोलिसांचे लसीकरण पुर्ण झाले असून हे प्रमाण ९५.२५ टक्के असल्याचे त्यांनी नमूद केले. जिल्हयात दोनचाकी वाहन, घरफोडी, मोबाईल चोरी, गळ्यातील सोन-साखळी चोरीचे प्रमाण वाढलेले आहे. त्या बरोबरच गांजा तस्करी, गुटखा, मावा व अवैध दारू मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात देखील होत असल्यामुळे ती होऊच नये, यासाठी पोलिस प्रशासन विशेष लक्ष देऊन दक्ष राहणार आहे. तसेच जिल्हयातील चोरीचे प्रमाण कमी करण्यासाठी चोरट्यांच्या चोरी करण्याच्या पध्दतीचा बारकाईने अभ्यास करून चोरी करणारी टोळी सक्रीय आहे किंवा भुरटे चोर आहेत यावर कायमस्वरूपी अंकुश ठेवण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. तर जिल्हयातील सर्व प्रकारची अवैध धंदे, कायमस्वरूपी रोखण्यासाठी आम्हाला असलेल्या संवैधानिक अधिकारांचा पुरेपूर वापर करून या गुन्हेंगारीचा बिमोड करणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. 

जिल्हयातील जनतेने अपराध विषयक तक्रारीबाबत जवळच्या पोलिसांना सतर्क करणे आवश्यक आहे.जनतेने सहकार्य केले तरच आम्हाला देखील वाढत्या गुन्हेगारीवर वेळेच देखरेख ठेवून त्यांची पाळेमुळे उखडता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे जनतेने न भिता संबंधित नजीकच्या पोलिसांबरोबरच अप्पर पोलिस अधिकक्षक नवनीतकुमार कॉवत यांच्या मो.९५६०४०९४७९ या क्रमांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 


 
Top