निजामशाहीच्या २२४ वर्षाच्या राजवटी नंतर, म्हणजे पहिला निजाम मिर कमरोद्दिन खान सिद्दिगी यांने १७२४ साली निजामशाहीची स्थापना केल्यापासून ते शेवटचा सातवा निजाम मिर उस्मान अली खान च्या १९४८ पर्यंतच्या राजवटीचा अनुभव मराठवाडयाने व पर्यायाने उस्मानाबाद जिल्हयाने घेतलेला आहे. २१५३३९ वर्ग किलोमिटर एवढया विस्तीर्ण क्षेत्रफळात विस्तारलेल्या निजाम राजवटी पैकी ४२% भूभाग म्हणजेच ९०४४२ वर्ग किलोमिटर क्षेत्रफळ असलेला मराठवाडयातील भूमभाग हा सर्फेखास सदरात मोडत होता. म्हणजेच निजामाच्या वैयक्तिक जहागीरीमध्ये मोडत होता. निजामशाहीचा अंमल असलेल्या मराठवाडयातील आताचे उस्मानाबाद व तत्कालीन धाराशिव हे त्यावेळी नळदुर्ग जिल्हयात होते. नळदुर्ग हे हैद्राबाद संस्थानातील एक महत्वाचे विभागीय केंद्र होते. विभागीय केंद्र असल्यामुळे नळदुर्ग च्या अंतर्गत आताचे उस्मानाबाद, सोलापूर, बीड, लातूर, परभणी ते औरंगाबाद एवढा प्रचंड मोठा भाग येत होता.

१९०४ मध्ये निजामाने लहान गावांचे जिल्हे करण्याचे धोरण तयार केले. त्या धोरणानुसार हजरत उस्मानगनी राझी उल्लह याने जिल्हयाचे केंद्र धाराशिवला हलवले व नळदुर्ग व वाशी असे दोन तहसिल विभाग बनवले जे पुढे १९०५ मध्ये नळदुर्ग तुळजापूर तहसिलला तर वाशी भूम तहसिलला जोडले गेले. धाराशिवचे नामकरण उस्मानाबाद असे १९१० साली केले. खरे तर सव्वा दोनशे वर्षांच्या निजाम राजवटीपैकी १८७ वर्षे म्हणजे पहिल्या सहा निजामांच्या राजवटीत कोलाही धाराशीव या नावाची कसलीही अडचण वाटली नव्हती. या उलट पहिल्या सहा ही निजामांच्या राजवटीत मंदिरांचे बांधकाम करणे, जिर्णोध्दार करणे, मंदिरांना जमीनी दान देणे, पुजा अर्चेची व्यवस्था लावणे अशा अनेक कामांमधून सामाजीक सलोखा राबविण्याचे धोरण दिसून येते. मात्र शेवटच्या निजाम मिर उस्मान आली खानच्या ३७ वर्षांच्या राजवटीत मात्र वरील धोरणाला हरताळ फासल्याचे दिसून येते. त्यांचाच परिणाम म्हणजे धाराशिवचे नामकरण उस्मानाबाद होय.

चौदाव्या शतकाच्या आरंभापासून हा भाग अल्लाउद्दीन खिल्जीने दिल्ली च्या साम्राज्यात समाविष्ठ केला होता. परंतू बहामनी राज्याची स्थापना झाल्यानंतर हा भाग बहामनी साम्राज्यात समाविष्ठ झाला. नंतर हा भाग अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही यात गेला. औरंगजेबने दक्षिण जिंकल्यानंतर पुन्हा मोगलांकडे गेला. १८५३ मध्ये हा भाग इंग्रजांना दिला व पुन्हा १८५७ च्या स्वातंत्र्य युध्दानंतर १८६१ साली पुन्हा निजामास परत देण्यात आला. असा हा आपल्या भागाचा प्रवास थक्क करणारा आहे.

असे म्हटले जायचे की हैद्राबादचा निजाम हा जगातील सर्वांत जास्त श्रीमंत व्यक्ती होता. तेलंगाना, मराठवाडा, उत्तर कर्नाटक व विदर्भाचा काही भाग हैद्राबाद संस्थानात होता व एकूण क्षेत्रफळाच्या ४२% क्षेत्रफळ ‘सर्फखास’ सदरात मोडत असे. सर्फेखास म्हणजे निजामाची व्यक्तिगत जहागीर. याशिवाय निजाम व्यक्तिगत खर्चासाठी तिजोरीतून दरवर्षी पन्नास लाख रुपये घेत असे. अनेक बेगमा, पुत्र, कन्या, साहेबजादे, अनेक नोकरचाकर या सर्वांचा बोजा प्रजेकडून कर रुपी गोळा होणाऱ्या रक्कमेवर म्हणजेच प्रजेवर पडत असे. निजामाची स्वतंत्र तार ऑफीस, पोस्ट ऑफीस, रेल्वे, सैन्य, हेलिकॉप्टर अशी स्वतंत्र व्यवस्था होती. यावरून त्याची ताकत व श्रीमंती लक्षात येते. हे सर्व निजामाच्या ताब्यात १७२४ पासून ते १७ सप्टेंबर १९४८ पर्यंत म्हणजे तब्बल सव्वा दोनशे वर्षे होते. काय ताकत असून शकेल निजामाची यावरून अंदाज येवू शकतो.

भारत स्वतंत्र झाल्यानंतर ५६५ संस्थानांपैकी ५६२ संस्थाने देशात विलीन झाली. फक्त तीन संस्थानेच वेगळी स्वतंत्र भूमिका घेत होती त्यातील एक हैद्राबाद चा निजाम व इतर दोन म्हणजे कश्मीर व जुगा गड. देशाला स्वातंत्र्य मिळूनही मराठवाडयाला स्वतंत्र होण्यासाठी १३ महिने २ दिवस वाट पहावी लागली होती.

हैद्राबादचे स्वतंत्र अस्तित्व ठेवण्याच्या निजाम भूमिकेमुळे व भारतात सामिल होण्याच्या जनतेच्या इच्छेमुळे प्रचंड गदारोळ झाला. निजामाची एक संघटना ‘रझाकार’ जिचा प्रमुख होता कासीम रझवी, याने जनतेचे आतोनात हाल केले. या रझाकारांचा संबंध मजलीस-ए-इत्तेहादुल मुसलमीन म्हणजेच सध्या गाजत असलेल्या MIM या राजकीय पक्षाशी होता. हैद्राबादचे स्वतंत्र अस्तीत्व ठेवण्याला जनता साथ देत नसल्यामुळेच रझाकारांनी अनन्वीत अत्यचार केले.

हैद्राबाद मुक्ती संग्रामचे अर्ध्वयू स्वामी रामानंद तिर्थ, गोविंदभाई श्रॉफ व अशा अनेक मंडळींनी चालू ठेवलेल्या हैद्राबाद मुक्ती संग्रामास शेवटी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी Police Action ची साथ दिली आणि Police Action ची जबरदस्त कार्यवाही होताच निजामाचा सेनाप्रमुख जनरल अलइद्रिस शरण आला व पाठोपाठ निजामही शरण आला आणि १७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा मुक्त होऊन भारतात समाविष्ठ झाला, व १९६० साली स्वतंत्र महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर उस्मानाबाद महाराष्ट्राचा जिल्हा बनला गेला.

१ मे १९६२ रोजी जिल्हा परिषद अस्तित्वात आली. तेव्हा लातूरही याच उस्मानाबाद जिल्हयातील एक तालुका होता. १५ ऑगस्ट १९८२ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांनी जिल्हयाचे विभाजन करून लातूर, औसा, उदगीर, अमहदपूर व निलंगा असे मिळून नवीन लातूर जिल्हयाची निर्मिती केली व उस्मानाबाद जिल्हयात उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा, कळंब, भूम व परांडा असे सहा तालुके राहिले. नंतर १९९९ मध्ये उमरगा व भूम तालुक्यांचे विभाजन होवून लोहारा व वाशी या दोन नवीन तालुक्यांची निर्मिती होवून एकूण आठ तालुके झाले. उस्मानाबाद जिल्हयाचे क्षेत्रफळ ७३६९.५ चौरस कि. मी. असून समुद्रसपाटीपासून २००० फुट उंचीवर आहे. यातील भूम, कळंब, उस्मानाबाद व तुळजापूर हे तालुके बालाघाट डोंगररांगांच्या कक्षेत येतात.

जिल्हयाचा काही भाग गोदावरी नदी खोऱ्यात तर काही भाग कृष्णा नदीच्या खोऱ्यात येतो. गोदावरी नदीची प्रमुख उपनदी मांजरा नदीच्या खोऱ्यात कळंब तालुका येतो. तर मांजराची उपनदी तेरणा नदीच्या कक्षेत उस्मानाबाद व उमरगा हे तालुके येतात. परांडा, भूम, तुळजापूर व उमरग्याचा काही भाग सीना नदीच्या खोऱ्यात येतो. जिल्हयातून मांजरा, तेरणा, सीना व बोरी या प्रमुख नद्या वाहतात. जिल्हयाचे सरासरी पर्जण्यमान ७६८.९ मिली मिटर इतके आहे.

उस्मानाबाद जिल्हयाच्या दक्षिण पश्चिमेस सोलापूर ची हद्द असून उत्तर पश्चिमेस अहमदनगर, उत्तरेस बीड, इशान्य व पुर्व दिशेला लातूर तर दक्षिणेला कर्नाटक राज्यातील बिदर व गुलबर्गा हे जिल्हे येतात.

उस्मानाबाद जिल्हयाचा बहुतांश भाग बालाघाटच्या डोंगर रांगांच्या कक्षेत येत असल्यामुळे नैसर्गिकरित्या निसर्ग सौंदर्य, दऱ्या, डोंगर, अभयारण्य, प्राणी, पक्षी, वृक्ष, वेली, लेणी, तीर्थस्थाने असा पर्यटकांना मेजवानी ठरणारा खजानाच उस्मानाबाद जिल्हयाच्या वाटयाला आला आहे. हे सृष्ठीसौंदर्य encash करायचे ठरवल्यास फार मोठी Tourism Industry उस्मानाबाद जिल्हयात उभी राहू शकते. उस्मानाबादी शेळी, उस्मानाबादचा गुलाबजामून, उस्मानाबाद जिल्हयातीलच सरमकुंडीचा पेढा हे भारतभर आपली स्वतंत्र ओळख व स्थान टिकवून आहेत. खो-खो, कबड्डी अशा मैदानी खेळामध्येही उस्मानाबाद जिल्हयाची पताका सर्वत्र फडकावत ठेवली आहे. आई तुळजाभवानी व संत गोरोबाकाकांच्या वास्तव्याने पावन झालेल्या उस्मानाबाद जिल्हयाला साहित्य व साहित्यिकांचा वारसाही तितक्याच श्रेष्ठ दर्जाचा प्राप्त झालेला आहे. राजकारणासारख्या क्षेत्रातही देशभरात सन्मानाने घेतल्याजाणाऱ्या नावापैकी कै. उध्दवरावदादा पाटील हे नावही उस्मानाबाद जिल्हयानेच दिलेले आहे. भारत देश स्वतंत्र झाल्यानंतरही तब्बल तेरा महिने मराठवाडा पारतंत्र्यातच राहिला होता. त्या मराठवाडा मुक्ती संग्राममध्ये निजामाच्या कचाटयातून व कासीम रझवी व रझाकारांच्याअन्यायातून मुक्त होण्यात उस्मानाबाद जिल्हयातील अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी जिवाची बाजी लावून स्वामी रामानंद तिर्थ आणि गोविंदभाई श्रॉफ यांच्या खांद्याला खांदा लावून मराठवाडा १७ सप्टेंबर १९४८ रोजी स्वतंत्र करण्यात उस्मानाबाद जिल्हयाने सिंहाचा वाटा उचललेला आहे.

मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या माध्यमातून अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी निजामशाही उलटून टाकण्यासाठी आपल्या जीवाचे बलिदान दिले. अशा सर्व शहीद स्वातंत्र्य सैनिकांना १७ सप्टेंबर, या मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने मनापासून आदरपूर्वक अभिवादन करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.

युवराज नळे (साहित्यिक) C/o 

नवजीवन उद्योग,

 A-57, MIDC, उस्मानाबाद 

yuwarajnale@gmail.com 

Mobil - 9623859511


 
Top