काटी / प्रतिनिधी-

 तुळजापूर तालुक्यातील काटी येथे मंगळवार दि. 31 रोजी येथील ग्रामपंचायत कार्यालयात   आगामी गणेशोत्सवासंदर्भात तामलवाडी पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील प्रमुख पदाधिकारी व महत्त्वाच्या गणेश मंडळाच्या प्रतिनिधींसोबत  बैठक घेण्यात आली. या वेळी करोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचे व यंदा गावात एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविण्याचे आवाहन पोलिस उपनिरीक्षक सचिन पंडीत यांनी सर्व गणेश मंडळांना केले होते. या बैठकीत सर्व गणेश मंडळांच्या प्रमुखांनी आपली भूमिका मांडून यासंदर्भात व्यापक अशी चर्चा होऊन गावात एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.

  कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्र्वभूमीवर व पोलीसांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व गणेश मंडळांनी गावात एक गाव एक गणपती ही महत्वपूर्ण संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतल्याने या कौतुकास्पद निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे. तसेच तामलवाडी पोलिसांमार्फत पोलीस उपनिरीक्षक सचिन पंडीत यांनी या निर्णयाचे अभिनंदन केले.

      प्रारंभी तामलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन पंडीत यांनी सर्व प्रमुख पदाधिकारी व सर्व गणेश मंडळांच्या प्रतिनिधीसोबत झालेल्या बैठकीत करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या सार्वजनिक गणेशोत्सव मार्गदर्शक सूचनांबाबत मंडळाच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. गेल्या वर्षीप्रमाणेच उत्सव साजरा करावा, गर्दी टाळण्यासाठी गणेश मंडळांनी गावात ग्रामपंचायत कार्यालयासमोर एकच गणपतीची स्थापना करावी, दररोज एका गणेश मंडळाने आरती करावी, विसर्जनाच्या बाबतीत नियमांचे पालन करावे, करोनाचा प्रादुर्भाव होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना मंडळांच्या प्रतिनिधींना दिल्या.पोलिस प्रशासनाने गणेश मंडळांच्या प्रतिनिधींच्या सूचना जाणून घेतल्या. यामध्ये प्रामुख्याने गावात अवैधरित्या सुरु असलेल्या हातभट्टी दारु विक्री बंद करावी अशी मागणी करण्यात आली. यावर पोलीस उपनिरीक्षक पंडित यांनी  लवकरच अवैध दारु विक्रेत्यांवर  कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. तामलवाडी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या 27 गावात यंदा कोरोना संक्रमणाच्या पार्श्र्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन करण्यात येत असून यास सर्व लोकप्रतिनिधी व सर्व गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन पंडीत यांनी सांगितले.

        यावेळी पोलीस उपनिरीक्षक सचिन पंडीत, सरपंच आदेश कोळी, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा चेअरमन विक्रमसिंह देशमुख, माजी चेअरमन सयाजीराव देशमुख, माजी उपसरपंच बाबुमियॉं काझी, पत्रकार उमाजी गायकवाड,करीम बेग,पोहेकॉं आकाश सुरनर, पोहेकॉं गिरी, पोलीस पाटील जामुवंत म्हेत्रे,माजी सैनिक श्रीकांत गाटे, रामेश्वर लाडुळकर, जितेंद्र गुंड, मकरंद देशमुख, बाळासाहेब भाले,अनिल बनसोडे, सुहास साळुंके,भैरी काळे, अविनाश वाडकर,नजीब काझी दत्तात्रय हंगरकर आदी पदाधिकाऱ्यासह मावळे गणेशोत्सव,राजे संभाजी, क्रांती मंडळ, छत्रपती गणेश मंडळ, महात्मा फुले गणेशोत्सव, जय मल्हार गणेशोत्सव मंडळासह आदी मंडळातील सदस्य  उपस्थित होते.

 
Top