उस्मानाबाद / प्रतिनिधी-

कळंब तालुक्यातील निपाणी येथील तरुण शेतकरी अशोक राजेंद्र गुंड (वय 29) यांनी नापिकीस कंटाळून विष प्राषन करुन आत्महत्या केली आहे. या गुंड कुटूंबाची जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी रविवारी (दि.29) भेट घेवून सांत्वन केले.

तरुण शेतकरी अशोक गुंड हे सोयाबीन पिकाच्या नापिकीने हवालदिल झाले होते. विष प्राषन करण्यापूर्वी त्यांनी व्हिडिओ करून तो सोशल मेडियावर अपलोड केला होता. त्यांनी या व्हिडिओमध्ये शासनाने सोयाबीनचे पंचनामे करून पाहणी करावी. पाडोळी, शिराढोण, निपाणी शिवारातील पिके पावसाअभावी करपून गेली आहेत. या पिकात जनावरे सोडण्याची पाळी शेतकर्‍यांना आली आहे. गेल्या 25 दिवसांपासून पाऊसही नाही, लाईट नाही तरी प्रशासनाने याची दखल घ्यावी, अशी विनंती केली होती. तसेच स्वतःची सोयाबीन उपटून टाकत, या प्लॉटमध्ये काहीही राहिले नाही, असेही ते म्हणत होते. आता तर शेतकर्‍यांना सोयाबीनमुळे उपासमारीची वेळ आली असून याकडे विमा कंपनी व शासनाने लक्ष देऊन पंचनाम्याची गरज असल्याची खंत व्यक्त केली होती. हा व्हिडिओ व्हायरल करूनही प्रशासनाला जाग आली नाही. अखेर या नैराश्यातून त्यांनी विष प्राशन केले होते. या कुटूंबाची संजय दुधगावकर यांनी भेट घेवून विचारपूस केली. यावेळी त्यांच्या समवेत सरपंच दादाराव गुंड, माजी सरपंच सुरेश पाटील, उपसरपंच राहुल पाटील, किशोर गुंड, रामकृष्ण गुंड, तात्या कवडे, डॉ. कवडे, जयकिसन गुंड, गुणवंत गुंड, संभाजी गुंड आदींची उपस्थिती होती.

 
Top