उस्मानाबाद / प्रतिनिधी-

येथील पंडित कांबळे यांच्या ‘चरथ भिक्खवे’ कवितासंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे.

पंडित कांबळे हे उस्मानाबाद नगरपरिषद शाळा क्रमांक १४ येथे प्रभारी मुख्याध्यापक आहेत. त्यांचे दोन कवितासंग्रह, तीन बालकवितासंग्रह, दोन संपादने प्रकाशित झालेली आहेत. कथा, कविता, समीक्षा, ललित, वैचारिक आदी प्रकारात त्यांनी लेखन केले आहे. त्यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. औरंगाबाद येथील ‘झेप’च्या वतीने साहित्य, वृत्तपत्र व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना देण्यात येणारे ‘मातोश्री हरणाबाई जाधव राज्यस्तरीय वांङमय पुरस्कार २०२० जाहीर करण्यात आले आहेत. वितरण डिसेंबरमध्ये औरंगाबाद येथे होणाऱ्या साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची घोषणा कोअर कमिटीने केली आहे. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल आणि पुष्पहार असे पुरस्काराचे स्वरूप आहे, असे झेप साहित्य संमेलनाचे संयोजक डी. एन. जाधव यांनी कळवले आहे. पुरस्काराबद्दल पंडित कांबळे यांचा डॉ. विद्याधर बनसोड, योगीराज वाघमारे, रमेश बोर्डेकर, जयराज खुने, यू. डी. गायकवाड, राजेंद्र धावारे, अतुल लष्करे यांनी कौतुक केले.


 
Top