उस्मानाबाद / प्रतिनिधी-

महाराष्ट्र राज्य फलोत्पादनामध्ये अग्रेसर आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात फळे आणि भाजीपाला लागवड करण्यात येते. विशेषत: द्राक्ष, आंबा, डाळींब, संत्री, मोसंबी या फळपिकांची आणि विविध भाजीपाला पीकांची व्यावसायिक दृष्टिकोनातून वेगवेगळ्या लागवड तंत्रज्ञानाचा वापर करुन निर्यातक्षम दर्जाचे उत्पादन करण्यात येत आहे.

 राज्यात जास्तीत जास्त फळे आणि भाजीपाला पिकांचे उत्पादन करुन युरोपीयन आणि इतर देशांना निर्यात केली जाते. युरोपीयन देशांनी कीडनाशकांचा उर्वरत अंश मुक्तीची हमी अट घातल्याने 2004-05 पासून राज्यात अपेडाच्या मार्गदर्शनाखाली ग्रेपनेट, मँगोनेट, सीट्रसनेट, अनारनेट आणि व्हेजनेट या ऑनलाईन कार्यप्रणालीद्वारे निर्यातक्षम बागांची नोंदणी करण्याची कार्यवाही करण्यात येते.

 जिल्ह्यात आंबा तसेच द्राक्ष पीकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्यामुळे जिल्ह्यामध्ये कृषी माल निर्यात करण्याची संधी आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील शेतकरी, उद्योजक आणि व्यावसायिक यांना निर्यातीविषयक सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामध्ये कृषी माल निर्यात मार्गदर्शन केंद्र सुरु करण्यात येत आहे. या कक्षामध्ये शेती विषयक व्यवसायाबाबत आणि निर्याती बाबत अनुसरावयाची कार्यपध्दती, कागदपत्रांची पूर्तता, विविध देशांच्या अटी शर्तींचे पालन तसेच पॅकिंग, ग्रेडींग आदी माहिती बाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

 तरी जास्तीत जास्त शेतकरी, उद्योजक यांनी याचा लाभ घ्यावा.तसेच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ग्रेपनेट आणि मँगोनेट या ऑनलाईन कार्यप्रणालीद्वारे आपल्या बागांची नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश बिराजदार यांनी केले आहे.

 
Top