उस्मानाबाद / प्रतिनिधी-

आसमानी व सुलतानी संकटाचा सतत सामना करणाऱ्या शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली व होत आहे. त्यामुळे त्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी राजकीय मंडळींनी राष्ट्रीयीकृत बँकेच्या माध्यमातून आर्थिक मदतीचे सहकार्य करून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे चेअरमन ब्रिजलाल मोदाणी यांनी दि.१३ ऑगस्ट रोजी केले.

 राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी संजय पाटील दुधगावकर यांची निवड झाल्याबद्दल तर जिल्हा बँकेचे व्यवस्थापक सुधीर जगताप हे सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे चेअरमन ब्रिजलाल मोदाणी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख प्रवीण कोकाटे, एच.एम. देवकते, संभाजी राजेनिंबाळकर, कुमार राजेनिंबाळकर, नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, धनंजय पाटील, धनंजय राऊत, सुरेश गंगावणे, मुन्ना इंगळे, वसीम कुरेशी, अभिजीत देडे, नंदू माने, कृष्णा मुंडे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना मोदाणी म्हणाले की, शेतकऱ्यांना अति पाऊस झाल्यावर देखील नुकसान सोसावे लागते तर दुसरीकडे पाऊस न झाल्यामुळे देखील त्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो. या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँका धजावत नाहीत. त्यामुळे त्यांची अवस्था दयनीय झाली व होत आहे. विशेष म्हणजे शेतीशी निगडीत उद्योगधंद्यावर अवलंबून असलेल्या गोरगरिबांना देखील त्याचा फटका बसतो व बसत चालला आहे. गोरगरिबांसाठी शासनाच्या विविध योजना असल्या तरी त्याचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांना मिळत नसल्यामुळे ते वंचित राहत आहेत. त्यामुळे त्यांना देखील राजकीय मंडळींनी विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.


 
Top