तुळजापूर / प्रतिनिधी-

 इतर मागासवर्गीय व भटक्या विमुक्त जाती-जमातींच्या सर्वपक्षीय राज्यव्यापी मेळाव्याचे सोलापूर येथे ३१ ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आल्याचे स्वागताध्यक्ष आमदार राजेश राठोड यांनी सांगितले.

या मेळाव्यात ओबीसी व भटक्या विमुक्त जाती-जमातीच्या प्रश्नांवर महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार असल्याने या मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आमदार राठोड यांनी केले आहे. येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत आमदार राठोड बोलत होते. 

यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, गुलाब जाधव, हरीश जाधव, शेषराव चव्हाण, वैभव जाधव, डॉ. सूरज चव्हाण, लक्ष्मण चव्हाण, दत्तात्रय मस्के, उत्तम चव्हाण आदी उपस्थित होते.

सोलापूर येथील टाकळकर मंगल कार्यालय ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता मेळाव्यास सुरुवात होणार आहे. या मेळाव्यात राज्य मंत्रिमंडळातील मदत व पुनवर्सनमंत्री विजय वडेट्टीवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बबनराव ढाकणे, अण्णासाहेब डांगे, संजय राठोड, सीताराम म्हेत्रे, आमदार प्रणिती शिंदे, माजी खासदार हुसेन दलवाई, रामराव वडतीले, लक्ष्मणराव गायकवाड, लक्ष्मणरव माने आदी सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती राहणार आहे. सदर मेळावा हा सर्व पक्ष व राज्यातील सर्व संघटनांना सोबत घेऊन आयोजित करण्यात आला आहे, असे आमदार राजेश राठोड यांनी सांगितले.

मेळाव्यातील मांडण्यात येणाऱ्या प्रमुख मागण्या

२०२१ मधील जनगणनेत ओबीसी व भटक्या विमुक्त जाती-जमाती यांची स्वतंत्र जनगणना करावी, नॉन क्रिमीलेअर गट रद्द करावा, मंडल आयोगाची प्रभावी अंमलबजावणी करावी, महागाई निर्देशांकाप्रमाणे ओबीसी शिष्यवृत्ती वाढवावी, शासकीय नोकरीत पदोन्नती मिळावी, खासगी नोकरीत ओबीसी व भटके-विमुक्त आरक्षण लागु करावे, प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह उभारावे, सोलापूर येथे भटके-विमुक्त स्मारक उभे करावे, विमुक्त जाती जमातीच्या लोकांना पक्की घरे बांधून द्यावीत, तसेच शेतजमीन मिळावी, तांडा वस्ती सुधार जिल्हास्तरीय समिती स्थापन कराव्यात आदी मागण्या या मेळाव्यात मांडण्यात येणार असल्याचे आमदार राठोड यांनी सांगितले.

 
Top