उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उमरगा तालुक्यात कडदोरा येथील जिल्हा परिषद प्रा. शाळा दगदंबानगर येथे कार्यरत उमेश रघुनाथ खोसे यांना राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.

भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या वतीने देशातील ४५ शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर केला आहे. यात महाराष्ट्रातील एकमेव उमेश खोसे यांचा समावेश आहे. यापूर्वीही त्यांना राष्ट्रीय आयसीटी पुरस्कार जाहीर झाला आहे. ग्रामीण भागातील मुलांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शिक्षण शिक्षण देण्यासाठी त्यांनी ज्या तांड्यावर मोबाइलची रेंज नव्हती तेथील मुलांना शिकवण्यासाठी ५१ ऑफलाइन अॅप्सची निर्मिती केली. तसेच मुलांच्या साहाय्याने व्हिडिओ निर्मिती करून मुलांना स्वयंअध्ययनाच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. तांड्यावरील मुलांना त्यांच्याच बोलीभाषेतून शिक्षण मिळावे यासाठी त्यांच्याच बंजारा बोली भाषेत पहिलीचे पुस्तक अनुवादित करून त्याच भाषेत डिजिटल साहित्य निर्माण केले. बोलीभाषा व तंत्रज्ञान या उपक्रमाची निवड राज्यस्तरावरील शिक्षणाची वारी या उपक्रमात झाली होती. यासह अनेक उपक्रम राबवल्याबद्दल त्यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.


 
Top