परंडा / प्रतिनिधी-

पद्मभूषण,पद्मश्री जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी येथील संत यादव बाबा मंदिर निवासस्थानी प्रहार शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना उस्मानाबाद च्या शिष्टमंडळाने भेट घेतली.

अण्णा आपल्या अनुभवाचे बोल सांगताना म्हणाले कार्यकर्त्यांच्या जीवनात अपमान पचविण्याची शक्ती असावी लागते, जनहितासाठी काम करताना अडचणी आल्या, विरोध झाला,निंदा होत राहिली तरी थांबायचे नाही.

“एक बीजा केला नाश!मग भोगिले कणीस!! म्हणजे जीवनात त्याग करावा लागतो.मन हे चंचल नव्हे तेज आहे.तेज नव्हे तर धोकेबाज आहे.कधी धोका देईल सांगता येत नाही.वैचारिक अधिष्ठान जपले पाहिजे.विरोधाला उत्तर शब्दाने देऊ नका, त्याला कृतीने उत्तर द्या.

अण्णाची नक्कल कुणी करू नका,चार भिंतीतील प्रपंच करत करत समाजसेवेचा,देशसेवेचा मोठा प्रपंच करा.समविचारी तरूणांनी एकत्र येऊन समाज सेवेची चळवळ उभा करावी.

कार्यकर्त्यांने मन स्वच्छ ठेवावे अगणित आनंद मिळेल,बाह्य गोष्टीत आनंद शोधु नका तो मिळणार नाही,जरी मिळाला तरी टिकणार नाही.तो क्षणिक असेल म्हणून आंतरिक आनंद जपा व इतरांनाही आनंदी ठेवा.  जात-पात,धर्म याचा राष्ट्राला मोठा धोका आहे. जेवढा बाहेरील देशाकडून नाही.अन्याय, अत्याचार विरोधात आवाज उठवला पाहिजे, लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करा,अहिंसेने न्यायासाठी संघर्ष करा.शिष्टमंडळाला अण्णांनी अनमोल उपदेश केला की “सत्य की नाव कभी हिलती है! डुलती है, पर कभी डुबती नहीं!! जीवनात नेहमी स्वाभिमान बाळगा, भ्रष्टाचाराला अजिबात थारा देऊ नका.करणा-याला अद्दल घडवली पाहिजे.

मी, माझं हे सोडून पहा मग जीवनाचा खरा अर्थ कळेल,दु:ख जवळ येणारच नाही हे अनुभवाचे बोल आहेत.“बुद्धी,अनुभव आणि कृती यांची योग्य सांगड घालून जीवन जगा आनंद ओसंडून वाहिल.”  यावेळी अण्णांचा बुके देऊन सत्कार केला.

याप्रसंगी प्रहार शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष वैजीनाथ सावंत, परंडा तालुका नेते लक्ष्मण औताडे,संघटक सुबराव सुरवसे व रेवण वायफळकर आदि.उपस्थित होते.

 
Top