उस्मानाबाद / प्रतिनिधी-

पावसातील खंडामुळे झालेले नुकसान मान्य करत अपेक्षेप्रमाणे जिल्हाधिकारी यांनी 25 टक्के अग्रीम रक्कम देणेबाबत अधिसूचना काढण्याचे आदेश आज झालेल्या बैठकीमध्ये दिले. आपण सुरू केलेल्या प्रयत्नाला यश मिळाले असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यामुळे नक्कीच दिलासा मिळेल, असे मत भाजचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केले.  यावेळी त्यांनी आपण आवाहन करून देखील पालकमंत्री व कृषी मंत्री या बैठकीत सहभागी न झाल्यामुळे त्यांनी खंत व्यक्त केली.

 उस्मानाबाद जिल्हावासीयांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या खरीप २०२० मधील नुकसान भरपाई च्या अनुषंगाने माननीय पालकमंत्री व माननीय कृषीमंत्री यांना आजच्या बैठकीमध्ये सहभाग नोंदवावा अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांच्या वतीने केली होती. अन्नदाता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ते गांभीर्य दाखवतील व अनेक महिन्यां पासून प्रलंबित बैठक निदान व्हर्च्युअली उपस्थित राहून तरी संवेदनशीलता दाखवतील असे वाटत होते. परंतु ते सहभागी न झाल्याने शिवसेनेची शेतकाऱ्यां विषयीची  अनास्था पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे.  खरीप २०२० मधील पीक विम्यापोटी कंपनीला 500 कोटींहून अधिकचा नफा होत आहे. वारंवार मागणी करून देखील कृषी मंत्री बैठक का बोलावत नाहीत ? हे आता जनतेला समजून आले आहे. 

 या विषयावर न्यायालयीन लढा तर सुरू आहे मात्र शेतकऱ्यांना लवकर न्याय मिळावा यासाठी शासन स्तरावर बैठकीची मागणी केली होती. आजच्या बैठकीमध्ये कृषी आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून पुढील कार्यप्रणाली निश्चित केलेली आहे.


 
Top