उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्ह्यातील धुळे-बेंगळुरु व मुंबई-हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर ६ महिन्यांपासून हाॅटेल्स अाणि ढाब्यांवर बायोडिझेलच्या नावाखाली विना परवानगी केमिकल युक्त डिझेलची सर्रास विक्री चालू आहे. या केमिकल विक्रीला जिल्हा प्रशासन कार्यालय व पोलिस अधीक्षक कार्यालयासह संबंधित इतर शासकीय कार्यालयांकडून एकही ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले नाही.त्यामुळे अशी विक्री राेखली जावी, अशी मागणी करण्यात अाली अाहे.

कोणत्याही कार्यालयात याची नोंद नाही. तसेच राष्ट्रीय महामार्ग व ज्वलनशील पदार्थांचा साठा करण्याबाबतचा कुठलाही परवाना न घेता मोठ्या प्रमाणात याची विक्री चालू आहे. हे केमिकल ज्वलनशील असल्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्घटना होऊ शकते. या केमिकलयुक्त डिझेलमुळे राज्य शासनाचा महसूल बुडत आहे व पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत आहे. ज्याअर्थी आयओसीएल, बीपीसीएल, एचपीसीएल या मानांकन शासकीय कंपन्यांच्या सर्व शासकीय कार्यालयाच्या परवानगी घेऊन व शासकीय मानांकन असलेले डीझेल व पेट्रोलची विक्री अधिकृत पंपावरून होते. जिल्ह्यातील बायोडिझेलच्या नावाखाली होत असलेल्या केमिकल युक्त अवैध डिझेलच्या विक्रीवर कार्यवाही करावी, या मागणीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी उस्मानाबाद जिल्हा पेट्रोलपंप चालक/मालक असोसिएशनचे अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटील, रज्जाक अत्तार, प्रशांत चेडे, रवींद्र शेरखाने, गिरीश हंबीरे, शहराध्यक्ष वैभव उंबरे, शहर सचिव प्रदीप खामकर, तुळजापूर तालुकाध्यक्ष आनंद कंदले, तालुका सचिव प्रशांत पाटील, कांबळे, परीक्षित खामकर, वैभव खंडागळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.


 
Top