उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 स्वातंत्र्य दिनाचा 74 वा वर्धापन दिन समारंभ साजरा करण्याची जिल्हा प्रशासनाची तयारी सुरु झाली आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या पूर्व तयारीच्या बैठकीत विविध विभागांना त्यांच्या जबाबदाराऱ्यांचे वाटप करण्यात आले. संबधित आधिकाऱ्यांनी त्यांना दिलेली जबाबदारी वेळेत पूर्ण करावी, असे आदेशही यावेळी देण्यात आले.

 येत्या 15 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणारा स्वातंत्र्य दिनाचा समारंभ कोरोना विषाणूची साखळी तोडण्याकरिता ‘ब्रेक द चेन अंतर्गत शासनाने 4 जून 2021 रोजी जारी केलेल्या आदेशाचे पालन करुन साजरा करण्याचे निर्देश राज्य शासनाने 30 जुलै 2021 रोजी दिले आहेत. येत्या 15 ऑगस्टला राज्यातील सर्व विभागीय, जिल्हा, उपविभागीय,तालुका मुख्यालय तसेच ग्रामपंचायत मुख्यालय येथे ध्वजारोहन करुन स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येणार आहे. उस्मानाबाद येथील मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री तथा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते होणार आहे.

 या समारंभास स्थानिक लोकप्रतीनिधी, स्वातंत्र्य सैनिक,शहिद जवानांच्या पत्नींना आणि आईवडिलांना तसेच कोरोना योध्दा तसेच डॉक्टर, सफाई कामगार, आरोग्यसेवक यांच्यासह या आजारावर मात केलेल्या काही नागरिकांना निमंत्रीत करण्यात येणार आहे.स्वातंत्र्य दिनाचा हा कार्यक्रम कोरोना प्रतिबंधाशी संबधित सर्व नियमांचे, सामाजिक अंतर (Social Distancing)चे नियम पाळून साजरा करण्यात येणार आहे.

 आज झालेल्या या बैठकीत जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता,अप्पर जिल्हाधिकारी रुपाली आवले यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व तयारी बाबत विविध सूचना केल्या.या बैठकीस उपजिल्हाधिकारी सचिन गिरी, जि.प. चे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. डी.के.पाटील, उस्मानाबादचे उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे,उस्मानाबादचे तहसीलदार गणेश माळी, शिक्षणाधिकारी, पोलिस अधिकारी,बांधकाम विभागातील अभियंता गजानन मुळे, न.प.चे मुख्याधिकारी यलगट्टे आदी उपस्थित होते.    

 
Top