उस्मानाबाद / प्रतिनिधी-

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा व नावलौकिक ऊंचावत असल्याचा मनस्वी आनंद आहे. अर्थ खात्याचा राज्यमंत्री या नात्याने पायाभूत सुविधांसाठी भरीव निधी देऊ, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री मा.ना.डॉ.भागवत कराड यांनी केले.

 डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६३ वा वर्धापन दिन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री मा.ना.डॉ.भागवत कराड यांच्या प्रमूख उपस्थितीत सोमवारी (दि.२३) विविध कार्यक्रमानी साजरा करण्यात आला. विद्यापीठाच्या नाटयगृहात मुख्य समारंभ झाला. यंदाच्या वर्धापनदिनाचे प्रमुख पाहुणे मा.ना.डॉ.भागवत कराड (केंद्रीय अर्थराज्यमंत्री) होते. कुलगुरू डॉ प्रमोद येवले अध्यक्षस्थानी होते. प्र-कुलगुरू डॉ श्याम शिरसाट , व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे,  कुलसचिव डॉ.जयश्री सूर्यवंशी, व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ जयसिंगराव देशमुख,

डॉ.नरेंद्र काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. जीवनसाधना पुरस्कार प्राप्त मो.अब्दुल रज्जाक व प्राचार्य डॉ.रमेश दापके यांची उपस्थिती होती.

यावेळी मा.ना.भागवत कराड म्हणाले, आपल्या राजकीय चळवळीची सुरुवात विद्यापीठातूनच झाली. एमबीबीएस व एम.एस अशा दोन पदव्या याच विद्यापीठात घेतल्या. आंदोलन, कामाच्या निमित्ताने शेकडो वेळा विद्यापीठात आलो मात्र मंत्री म्हणून वर्धापनदिनास उपस्थित राहता आले याचा मनस्वी आनंद आहे. चळवळीची पाश्र्वभुमी असलेले हे विद्यापीठ अत्यंत जागरुक व सजग विद्यार्थी घडवित असते. गेल्या काही वर्षात विद्यापीठात आंदोलन खुप होत असत. मा. डॉ.प्रमोद येवले यांच्या काळात शैक्षणिक दर्जा सुधारला असून आंदोलनेही कमी झाली आहेत, याचे श्रेय विद्यापीठातील सर्वांना दिले पाहिजे. वेंâद्र व राज्य सरकार विद्यापीठास भरीव निधी देईल, मात्र ‘एनआयआरएफ‘ रँकींग मध्ये पहिल्या पन्नास मध्ये विद्यापीठ यावे, असेही डॉ.भागवत कराड म्हणाले.

लोकांचा विश्वास मिळविण्यात यश : कुलगुरु

 कोणतीही सार्वजनिक संस्था लोकांचा विश्वास संपादन केल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. विद्यापीठाचा नावलौकिक ऊंचावतानाच गुणवत्ता सुधारुन लोकांचा विश्वास मिळविण्यात यशस्वी ठरलो, असे अध्यक्षीय समारोपात कुलगरु डॉ.प्रमोद येवले म्हणाले. मागासलेपण झटकून आम्ही प्रगती प्रगतीपथावर आहोत. विद्यापीठाची आर्थिक स्थिती बिकट असून अर्थमंत्रालयामार्फत सहकार्य व पाठबळ गरजेचे आहे, असेही कुलगुरु डॉ.प्रमोद येवले म्हणाले. आगामी काळात नामांतर शहीद स्मारक, सायन्स टेक्नॉलॉजी पार्वâ, विद्यापीठ गेटचे सुशोभिकरण, सिंथेटिक ट्रॅक, उद्योजकता विकास केंद्र विकसीत करणात येत, असल्याचेही ते म्हणाले. कार्यक्रमास माजी कुलगुरु प्राचार्य मधुकर गायकवाड, ज्येष्ठ सदस्य भाऊसाहेब राजळे, बामुक्टाचे अध्यक्ष डॉ.अंकुश कदम, डॉ संदीप देशमुख  आदींसह अनेकांची उपस्थिती होती.

 प्राचार्य डॉ.रमेश दापके  जीवनसाधना पुरस्काराने गौरव

 प्रारंभी डॉ.रमेश दापके यांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. या पुरस्कारमुळे आपल्या कार्याचा यथार्थ गौरव झाल्याची भावना डॉ.रमेश दापके यांनी व्यक्त केली. विद्यापीठाच्या इतिहास नामविस्तार आंदोलन याविषयी त्यांनी विस्तृत मार्गदर्शन केले . विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त दोघा मान्यवरांना जीवनसाधना पुरस्काराने गौरविण्यात आले. विद्यापीठाच्या उस्मानाबाद उपपरिसराचे माजी संचालक प्राचार्य डॉ.रमेश विठ्ठल दापके यांना ‘जीवन साधना पुरस्कार‘ प्रदान करण्यात आला. रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य, अधिसभा, व्यवस्थापन परिषदेसह शिक्षण क्षेत्रासाठी त्यांनी मोठे योगदान दिले.


 
Top