उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शासनाने रानभाज्याचे महत्व प्रसारीत करण्याबरोबरच त्याची  विपणन साखळी निर्माण करण्यासाठी रानभाजी महोत्सव जिल्हयात 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. यातून रानभाज्यांचे आरोग्य विषयक महत्व आणि जास्तीत जास्त ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना माहिती व्हावी आणि त्यांची विक्री व्यवस्था करुन त्यांच्या विक्रीतून शेतकऱ्यांना काही आर्थिक फायदा व्हावा हा हेतू आहे.

 या अभियानातून विशेषत: मानीव आरोग्यामध्ये सकस अन्नाचे अन्यन साधारण महत्व आहे.सकस अन्नामध्ये विविध भाज्यांचा समावेश असतो.रानभाज्या म्हणजे जंगलातील तसेच शेत शिवारातील नैसर्गिकरीत्या उगवल्या जाणाऱ्या रान पालेभाज्या,फळभाज्या,कंद भाज्यांमध्ये विविध प्रकारचे शरीराला आवश्यक असणारे पौष्टीक अन्नघटक आणि औषधी गुणधर्म असतात. या रानभाज्या नैसर्गिकरीत्या येत असल्यामुळे त्यावर रासायनिक कीटकनाशके फवारणी करण्यात येत नाही. त्यामुळे पुर्णपणे नैसर्गिक असलेल्या या रानभाज्यांचा योग्य वापर करणे आवश्यक आहे.

  दि.9 ते 15 ऑगस्ट 2021 या कालावधीत जिल्हयातील तालुका निहाय आणि दि.15 ऑगस्ट रोजी जिल्हा रानभाज्या महोत्सव मध्यवर्ती प्रशासकीय इमारत (सेंट्रल बिल्डींग ),उस्मानाबाद येथे  कृषी विभाग,आत्मा विभाग,कृषी विज्ञान केंद्र,कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.यामध्ये ठिक ठिकाणी रानभाजी आणि फळांची वैशिष्टे गुणधर्म आणि आरोग्यासाठी उपयोग संवर्धन पध्द्ती भाजीची पाककृती (रेसीपी ) याची सचित्र माहिती,तांत्रिक माहिती तसेच कृती बाबतही माहिती देण्यात येणार आहे.

  नागरीकांनी  या रानभाज्यांचा आस्वाद घेण्यासाठी महोत्सवास भेट द्यावी, असे आवाहन  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.


 
Top