उस्मानाबाद / प्रतिनिधी-

अतिप्राचीन असा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या तेर मध्ये 14 राज्य संरक्षित स्मारकांची नोंद झाली आहे. त्यांचे जतन, संवर्धन करण्यासाठी येणाऱ्या समस्यांचा विचार करुन शासन नियमानुसार या स्मारकांची महसुली अधिकार अभिलेखात अर्थात सात-बारा आणि इतर अधिकारात नोंद घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. संबंधित अधिकाऱ्यांनी शासकीय नियमांचा आधार घेत तेर गावठणाबाहेरील आठ राज्य संरक्षित स्मारकांची नोंद महसुली अभिलेखांत घेतली आहे. त्यामुळे या स्मारकाचे जतन, संवर्धन करणे, त्याच्या संरक्षणासाठी संरक्षण भिंत बांधणे किंवा इतर अनुषंगीक कामे करणे आता शक्य होणार आहे. ही माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने ९ ऑगस्टच्या रात्री उशीरा देण्यात आली. 

अशा प्रकारची कार्यवाही करणारा राज्यातील तेर म्हणजे प्राचीन तगर हे इ.स.पूर्व तिसऱ्या शतकापासून सलगपणे वैभवशाली इतिहास लाभलेले एक प्राचीन व्यापारी केंद्र आहे. याबाबतच्या पाऊलखुणा तेथील पुरातत्वीय अवशेष यांनी प्रचुर अशा पांढरीच्या टेकड्यांतून दिसून येतात. आतापर्यंत तेर येथील या पैकी काही टेकड्यांवर 1958 पासून आठ वेळा पुरातत्वीय उत्खनन करण्यात आले आहे. यातून प्राचीन तगर तथा तत्कालीन व्यापाराच्या महत्वपूर्ण पुरावशेष रुपी खुणा प्रकाशात आल्या आहेत. या पुरातत्वीय पाऊलखुणा आपल्या उदरात घेऊन निर्माण झालेल्या टेकड्या आणि येथील प्राचीन वास्तू अशा एकूण 14 ठिकाणे ही महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या अंतर्गत पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालये संचालनालय, मुंबई या विभागाने “ महाराष्ट्र प्राचीन स्मारके पुरावस्तुशास्त्रविषयक स्थळे आणि अवशेष अधिनियम 1960” चे पोटकलम 1 ते 4 नुसार राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केली आहेत.

 येथील जिल्हाधिकारी श्री. दिवेगावकर यांनी दि. 15 डिसेंबर, 2020 रोजी तेर येथील या स्थळांना प्रत्यक्ष भेटी देऊन या स्थळांच्या इतिहासाचे, जतन, संवर्धन तथा सद्यस्थिती, संरक्षण भिंत बांधणे आदी बाबींची माहिती घेऊन विविध सूचना दिल्या होत्या. औरंगाबाद येथील पुरातत्व कार्यालयातील तंत्र सहायक यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली होती. त्याअनुषंगाने याबाबत येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेऊन या बैठकीत तेर येथील 14 राज्य संरक्षित स्मारकांच्या अधिसूचनेप्रमाणे संरक्षित क्षेत्राची नोंद महसुली अभिलेखात (7/12) इतर अधिकारत घेण्याच्या दृष्टीने परिपूर्ण प्रस्ताव दाखल करण्याबाबत सूचित केले होते. त्यानुसार औरंगाबाद येथील पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक यांनी परिपूर्ण प्रस्ताव दाखल केला होता. याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी सचिन गिरी, उस्मानाबादचे उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, तहसीलदार गणेश माळी, नायब तहसीलदार संतोष पाटील, मंडळ अधिकारी ए.बी. तिर्थनकर, तेरचे तलाठी एस.एम.माळी आदींनी याबाबत कार्यवाही करून जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार गावठाणाबाहेरील आठ राज्य संरक्षित स्मारकाच्या नोंदी महसुली अभिलेखात घेतल्या आहेत. यामध्ये बैरागी पांढर, तिर्थकुंड, चैत्यगृह, तेरणा नदीपलीकडे असणारे क्षेत्र यात सुलेमान आणि रेणुकाई टेकडी, गोदावरी टेकडी यांचा समावेश आहे. पुरातत्व विभागाच्या वतीने तंत्र सहायक अमोल गोटे यांनी काम पाहिले.  

राज्यातील पहिली कार्यवाही

 ही प्रक्रिया 09 ऑगस्ट 2021 पर्यंत पूर्ण करण्यात आली आहे.या महत्वपूर्ण कामामुळे या स्मारकाच्या जतन संवर्धन, संरक्षण भिंत आणि इतर कामे करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर झाल्या आहेत. त्यामुळे पुरातत्व विभाग आणि सर्व इतिहास अभ्यासक यांच्याकडून आभार व्यक्त केले जात आहेत. तेरचा हा राज्य संरक्षित स्मारकाच्या अधिकार अभिलेखात नोंद घेण्याचा पॅटर्न पूर्ण महाराष्ट्रात राबविण्याबाबत पुरातत्व विभाग प्रयत्न करत आहे. महसूल विभागामार्फत ऐतिहासिक वारसा जपण्याच्या दृष्टीने उस्मानाबाद जिल्ह्यातील इतर पुरातत्वीय स्थळांबाबतही कायदेशीर नोंदीची प्रक्रिया राबविली जाणार आहे.अशा प्रकारे एकत्रितपणे एवढ्या स्मारकाच्या नोंदी घेण्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच प्रक्रिया आहे.


 
Top