उस्मानाबाद / प्रतिनिधी-

झाडांमुळे वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण चांगले राहण्यास नक्कीच मदत असून शुद्ध हवा देखील मिळते. कोरोनाच्या लाटेमध्ये अनेकांना आवश्यक असलेला ऑक्सिजन न मिळाल्यामुळे कित्येकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ही बाब अतिशय‌ दुःखद व मन हेलावणारी आहे. त्यामुळे मानवाला किमान भरपूर प्रमाणात शुद्ध हवा व ऑक्सिजन मिळावा यासाठी प्रत्येकांनी झाडे लावून ती जोपासावीत असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी रुपाली आवले यांनी दि.३ जुलै रोजी केले. 

 शहरातील बोंबले हनुमान परिसर व न.प. शाळा क्र.२२ येथे अप्पर जिल्हाधिकारी रुपाली आवले व जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. चारुशिला देशमुख यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षरोपणापूर्वी भटके-विमुक्त विकास प्रतिष्ठानच्यावतीने चालविण्यात येत असलेल्यांना शहरातील वासुदेव वस्ती येथील पालावरच्या शाळेस भेट देऊन त्यांनी विद्यार्थी व पालकांशी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ चारुशीला देशमुख, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयक शोभा कुलकर्णी, सीएमआरसीच्या व्यवस्थापक वनमला सावंत, सावित्री चाटे, पालावरच्या शाळेच्या गटप्रमुख मीरा मोटे, अनुसया सातपुते तर नगर परिषद शाळा क्र.२२ चे मुख्याध्यापक पी.आर. जांभळे, शाळा व्यवस्थापन व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा एन.एस. अत्तार, शिक्षिका जे.एल. डोंगरे, सी‌एन. जाधव, न.प.चे विलास गोरे, शिक्षण तज्ञ अमित उंबरे, सुनिल उंबरे, वैभव उंबरे, सामाजिक वनीकरण विभागाचे वनपाल थावरे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना आवले म्हणाल्या की, आपण हवेतून म्हणजेच निसर्गाकडून ऑक्सिजन घेतो. निसर्गाला परत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड करून ती झोपा असण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. झाडे आपल्याला ऑक्सिजनच देत नाहीत तर सावली, फुले, फळे, लाकूड, डिंक यासह इतर विविध वस्तू त्यापासून आपल्याला मिळतात असे त्यांना उदाहरणासह पटवून दिले. यावेळी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना बोलते करून त्यांच्याकडून शिक्षक जे शिकवतात त्याचा आपण बारकाईने अभ्यास करावा व आपले भविष्य सुखकर बनवावे. तसेच आई-वडिलांना मदत करावी असे आवाहन त्यांनी केले. तर उपस्थित महिला बचत गटाच्या महिलांना स्वयंरोजगार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून रोजगाराचे प्रशिक्षण दिले जाईल, त्यासाठी तुम्ही कोणता उद्योग निवडणार त्याची माहिती द्यावी असे आवाहन त्यांनी केले. यावेळी शोभा कुलकर्णी यांनी बचत गटाच्या माध्यमातून महिलांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. बोंबले हनुमान परिसरात लावण्यात आलेल्या वृक्षांचे जतन करण्याची जबाबदारी पालावरच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतली. तर नगर परिषद शाळा क्र.२२ च्या प्रांगणात लावण्यात आलेल्या वृक्षांचे जतन करण्याची जबाबदारी अमित उंबरे व त्यांच्या टीमने घेतली. या कार्यक्रमास विद्यार्थी, बचत गटाच्या महिला, शिक्षक व वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उंबर, करंज, सावर व पेरू आदी वृक्षांचे रोपण करण्यात आले.


 
Top