तेर / प्रतिनिधी-

उस्मानाबाद तालुक्यातील तेर ग्रामीण रुग्णालयातील उस्मानाबादला नेलेली रुग्णवाहिका परत तेरला पाठवण्यात यावी, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा रूग्णकल्याण समितीचे सदस्य जुनेद मोमीन व सुभाष कुलकर्णी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेली अनेक वर्षांपासून येथील रुग्णांची रुग्णवाहिकेअभावी हेळसांड होत होती. त्यानंतर रूग्णालयास शासकीय आरोग्य सेवेतून एक व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून एक रूग्णवाहिका देण्यात आली होती. परंतु जिल्हा शल्य चिकित्सक उस्मानाबाद यांनी शासकीय सेवेतील रुग्णवाहिका उस्मानाबाद येथील स्त्री रुग्णालयास वर्ग केली. आगामी कोरोनाची लाट लक्षात घेता दोन्ही रूग्णवाहिका कार्यरत असणे आवश्यक आहे. स्त्री रूग्णालयास हस्तांतरित केलेली रूग्णवाहिका सात दिवसात परत तेरला पाठवली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल. निवेदनाच्या प्रती आमदार राणाजगजितसिंह पाटील व जिल्हा शल्य चिकित्सकांना देण्यात आल्या आहेत.


 
Top