काटी / प्रतिनिधी

ग्रामस्थांना पिण्याचे पाणी व अन्य नागरी सुविधा द्याव्यात, यासाठी तुळजापूर तालुक्यातील काटी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव व माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव ढगे यांच्या नेतृत्वाखाली सुंदर गाव पुरस्कार प्राप्त काटी ग्रामपंचायतवर हलगी मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले. यावेळी सरपंच आदेश कोळी, ग्रामविकास अधिकारी लक्ष्मीकांत सुरवसे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. 

गावातील मुख्य मार्गावरून हा मोर्चा काढण्यात आला. गावात नियमीतपणे नळ योजनेद्वारे पाणीपुरवठा करावा, पथदिवे, हायमस्ट लॅम्प सुरू करावेत, गटारांची कामे करावीत, गावातील विद्युत पुरवठा सुरळीत करावा, पहाटे पाच ते आठ या काळात होणारी लोडशेडींग बंद करावी, गावात स्वच्छता मोहीम राबवून नागरिकांच्या आरोग्याची दक्षता घ्यावी, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका ओळखून वेळीच आवश्यक त्या उपाययोजना राबवाव्यात, रस्त्याची दुरूस्ती करावी, ग्रापंचा १५ वा वित्त आयोग, पाणीपुरवठा नविन कामे करण्यासाठी घेतलेली अनामत, ग्रामनिधीसह विविध विकास कामासाठी आलेल्या निधीचा नियमानुसार विनियोग करावा, खर्चाचा तपशिल जनतेसमोर मांडावा, ग्रामस्थांना मोफत नळ कनेक्शन द्यावे, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. मोर्चेकऱ्यांचे गाऱ्हाणे ऐकून घेऊन व त्यांनी दिलेल्या निवेदनाचा तात्काळ विचार करून सर्व ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेऊन निवेदनात मांडण्यात आलेल्या नागरी समस्या सोडविण्यासाठी निश्चित प्रयत्न करु असा विश्वास सरपंच आदेश कोळी, ग्रामसेवक लक्ष्मीकांत सुरवसे यांनी नागरिकांना दिला. तसेच येत्या सात दिवसात नागरी समस्या नाही सोडवल्या तर आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव यांनी दिला आहे.

   यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव, जि.प.चे माजी सभापती बाबुराव ढगे, तालुकाध्यक्ष त्रिगुणशील साळुंके, तालुका सरचिटणीस जुवीर शेख, कोषाध्यक्ष वसंत हेडे, शाखाध्यक्ष धनाजी गायकवाड, कोषाध्यक्ष वसंत हेडे, उपाध्यक्ष रामेश्वर लाडुळकर, बळी चवळे, दत्ता बनसोडे, अप्पा बनसोडे, विलास लोंढे, सुरेश भिसे, मधुकर साळुंके, सचिन काळे, माजी सरपंच गीता जाधव, ताई कांबळे आदींची उपस्थिती होती.


 
Top