तेर /प्रतिनिधी  

वानेवाडी (ता. उस्मानाबाद) येथे पैसा व गोगलगाय यांच्या प्रादुर्भावग्रस्त पिकाची पाहणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश घाडगे, डॉ. अनिता साबळे,सहयोगी प्राध्यापक कृषी महाविद्यालय ,उस्मानाबाद .तालुका कृषी अधिकारी डी. आर. जाधव, मंडळ कृषी अधिकारी सत्यजित देशमुख यांनी केली.

 वानेवाडी शिवारातील शेतकरी रेवणसिद्ध लामतुरे व वैभव उंबरे यांच्या सोयाबीन पिकामध्ये पैसा व गोगलगाय या किडीमुळे नुकसान झाल्याचे आढळून आले .यावेळी कृषी अधिकाऱ्यांनी प्रक्षेत्राची पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

पैसा व गोगलगाय या किडी पासून सोयाबीन पिकाचे संरक्षण करावयाचे असल्यास पीक तणविरहित ठेवावे. या किडी रात्रीच्या वेळी सक्रिय असल्याने शेतकऱ्यांनी शेतात गवताचे ठीक करून ठेवावे किंवा गवताच्या ढगाच्या ऐवजी बारदाना (सुतळी पोते) दहा लिटर पाण्यात एक किलो गूळ टाकून भिजवून पसरून ठेवावे, सकाळी गवताच्या डिगा खाली किंवा बारदाना खाली जमा झालेल्या किडी गोळा करून मिठाच्या द्रावणात किंवा कपडे धुण्याच्या सोड्याचे च्या द्रावणात किंवा कीटकनाशकाच्या द्रावणात टाकून माराव्यात. चांगला पाऊस झाल्यास  पैसा या किडीचे नैसर्गिक रित्या नियोजन होते. रासायनिक कीटकनाशक पैसा किडी करता : ल्याम्डा सायलोथ्यीन  कीटकनाशक 15 मिली प्रति 10 लिटर पाण्यात पिकावर फवारावे. गोगलगाय या किडीच्या नियंत्रणासाठी मेटाअल्डीहाईड  (स्नेलकिल ) गोळ्या दोन किलो प्रति एकरी शेतात फेकाव्यात. तसेच पैसा व गोगलगाय या दोन्ही किडीच्या नियंत्रणासाठी दोन किलो ज्वारीच्या भरडा घेऊन त्यामध्ये 50 मिली 5‌ टक्के फिप्रोनील (रीजेंट) कीटकनाशक मिसळावे. तो भरडा  प्रादुर्भावग्रस्त पिकांच्या ओळीमध्ये फेकावा. परंतु हा भरडा पक्षी व पाळीव प्राणी खाणार नाहीत याची दक्षता घ्यावी असा सल्ला कृषी अधिकारी यांनी दिला. यावेळी कृषी सहाय्यक वैभव लेनेकर तसेच विठ्ठल लामतुरे ,संजय धाकपाडे ,भास्कर काळे, वैभव उंबरे उपस्थित होते.


 
Top