उमरगा / प्रतिनिधी-
राष्ट्रीय महामार्गावर जकेकूर-चौरस्ता परिसरातील तीन हाॅटेलवर छापा टाकून उस्मानाबादच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने देहविक्रय करणाऱ्या १७ युवतींसह ३० जणांना ताब्यात घेतले. ही कारवाई बुधवारी दुपारी १२.३० च्या सुमारास करण्यात आली.
शहरापासून जवळच जकेकूर-चौरस्ता परिसरात असलेल्या औद्योगिक वसाहत परिसरात अवैध धंदे वाढले आहेत. अनेक हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असताना पोलिसांकडून दुर्लक्ष होत आहे. जकेकूर - चौरस्ता येथील विविध हॉटेल व लॉजवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर उस्मानाबाद जिल्हा स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन घाडगे यांनी पथकासह बुधवारी या भागातील तीन हाॅटेल व लॉजवर कारवाई करून वेश्याव्यवसाय करणाऱ्या १७ युवती आणि १३ युवकांना ताब्यात घेतले. दुपारी साडेबाराला सुरू झालेली कारवाई साडेतीन वाजता पूर्ण झाली. त्यानंतर सर्वांना उमरगा पोलिस ठाण्यात आणले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिस अधीक्षक राजतिलक रौशन, पोलिस उपअधीक्षक संदीप पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन घाडगे, सहायक पोलिस निरीक्षक मनोज निलंगेकर, पोलिस उपनिरीक्षक पांडुरंग माने, पोलिस उपनिरीक्षक सदानंद भुजबळ, पोलिस कर्मचारी वलीऊल्ला काझी, प्रदीप ठाकुर, राजेश साळुंके, शिवाजी शेळके, पोलिस नाईक महेश घुगे, हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, दीपक लावरे-पाटील, महिला पोलिस नाईक शैला टेळे, रंजना होळकर, बबन जाधवर, बलदेव ठाकुर, अविनाश मरलापल्ले, रवींद्र आरशेवाड, चालक धनंजय कवडे, सुभाष चौरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.