उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

१४ व्या वित्त आयोग निधीतून भूमिगत नाली बांधकामाच्या प्रस्तावात बदल करून नवीन प्रस्ताव दाखल करण्याच्या कामासाठी १० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या तालुक्यातील हावरगाव येथील ग्रामसेवकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवार दि. १९ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अटक केली. महेश औदुंबर शिंगाडे (वय ४२) अटक केलेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे. 

लाच लूचपत प्रतिबंधक विभागाने सांगितले की, तक्रारदाराने हावरगाव ग्रामपंचायत अंतर्गत भूमिगत नाली बांधकामाचा पूर्वी तयार करण्यात आलेल्या प्रस्तावात बदल करून नवीन प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी पंचायत समितीकडे पाठवण्याची मागणी ग्रामसेवक महेश शिंगाडे यांच्याकडे केली. याकामासाठी ग्रामसेवक यांनी नाली बांधकामाच्या एकूण निधीच्या १५ टक्के व सुरवातीस १० हजार रुपयांची लाचेची मागणी तक्रारदारकडे केली. यानंतर तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचेची १० हजार रुपये रक्कम कळंब शहरातील लता मंगेशकर शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावरील चहाच्या हॉटेल येथे स्विकारल्याने ताब्यात घेवुन त्यांचे विरुध्द कळंब पोलिसात रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक राहुल खाडे, अपर पोलीस अधीक्षक मारुती पंडीत, लाचलुच प्रतिबंधक विभागाचे औरंगाबाद पोलीस उपअधीक्षक प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक हुलगे, पोलीस अंमलदार इफत्तेकार शेख, पांडूरंग डंबरे, सिध्देश्वर तावसकर, अर्जुन मारकड यांनी केली. कोणताही शासकीय अधिकारी, कर्मचारी महाराष्ट्र शासनाचे मानधन, अनुदान घेणारी व्यक्ती, खाजगी व्यक्ती शासकीय कामासाठी अथवा शासकीय काम करुन दिल्या बद्दल लाचेची मागणी करत असेल तर लाचलूच प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 
Top