उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 सिंचन विहिरीच्या कामाचे बिल देण्यासाठी शेतकऱ्याकडून आठ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या उस्मानाबाद तालुक्यातील धारूर येथील ग्रामसेविकेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई मंगळवारी पंचायत समितीच्या आवारात करण्यात आली.

धारूर येथील एका शेतकऱ्याने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरीचे काम केले होते. काम पूर्ण केलेल्या सिंचन विहिरीच्या कुशल कामाचा २६ हजार ६६७ रुपयांचा धनादेश देण्यासाठी व पहिल्या बिलाची बाकी देण्यासाठी ग्रामसेविका अमरजा मुकुंद शेखदार यांनी ११ हजार रुपये लाचेची मागणी केली. शेतकऱ्याने या प्रकरणी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली. मंगळवारी पंचायत समितीच्या आवारात सापळा रचण्यात आला. आठ हजार रुपयांची लाच स्वीकारताना ग्रामसेविका शेखदार यांना पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक प्रशांत संपते यांच्या नेतृत्वाखाली पोलिस कर्मचारी दिनकर उगलमुगले, पांडुरंग डंबरे, अर्जुन मारकड, मधुकर जाधव, विष्णू बेळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.


 
Top