लोहारा/प्रतिनिधी

लोहारा तालुक्यातील अचलेर येथे कृषी विभागाच्या वतीने बीज प्रक्रिया व बीबीएफ तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. 

बीबीएफ ही पद्धत कोरडवाहू शेतीच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहे. तसेच अधिक व सततच्या पावसामध्ये अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने ही पद्धत उपयोगी ठरते. बीबीएफ तंत्राचा पेरणीसाठी अवलंब केल्यास जास्त पाऊस किंवा पावसाचा खंड या दोन्ही परिस्थितीत पिकाची वाढ चांगली होते. सोयाबीन, उडीद या पिकांची बीबीएफ च्या द्वारे पेरणी केल्यास उत्पादनामध्ये चांगली वाढ झालेली दिसून येते व त्याचबरोबर आंतरमशागत करणे सोयीस्कर होते. कोरडवाहू शेतकऱ्यांनी पेरणीसाठी बीबीएफ (रुंद वरंबा सरी) तंत्राचा अवलंब करावा व 80 ते 100 मिली मीटर पाऊस पडल्यानंतर पेरणी करावी,असे आवाहन तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग यांनी यावेळी केले.

 तर शेतकऱ्यांनी खते व बियाणे खरेदी करताना मूळ पावती घ्यावी व त्याच बरोबर पेरणी करताना रायझोबियम व पीएसबी यांची बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी असे आवाहन कृषी सहायक स्वामी चिदानंद व नागेश जट्टे यांनी केले. या प्रसंगी सुनील मदने शरणाप्पा पाटील, सिधू गोफने उपस्थित होते.

 
Top