उमरगा / प्रतिनिधी

उमरगा शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या पंधरा दिवसात डेंग्यू व चिकन गुनिया सदृश्य आजारांचा उद्रेक  होत आहे.  उतरगा तालुक्यात डेंगुसदृश ३८ रुग्ण आढळून आले आहेत. परिणामी आरोग्य प्रशासन खडबडून जागे झाले असून गावपातळीवर विविध उपाययोजना सुरू करण्यात आल्या असून रुग्ण व रुग्णाच्या संपर्कातील नागरिकांची रक्तचाचणी करण्यात येत आहेत. जिल्हास्तरावरील आरोग्य अधिकाऱ्यांनी उमरगा शहरासह प्रभावित गावात भेट देऊन पाहणी केली.

उमरगा तालुक्यात गेल्या पंधरा दिवसात सरकारी व खाजगी रुग्णालयात डेंग्यूसदृश्य आजाराचे तब्बल ३८ रुग्ण आढळून आले असून यामुळे आरोग्य प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. ९ जून ते २४ जून या कालावधीत उमरगा शहरात ११ तर ग्रामीण भागात २७ रुग्ण आढळुन आले आहेत. यात सर्वाधिक येळी येथे ९, गुंजोटी ३, एकोंडी २, दाळींब २, नारंगवाडी २, कदेर २ तर कडदोरा, तुरोरी, तुंगाव, सुपतगाव, कोळसुर, नाईचाकूर, बलसुर येथे प्रत्येकी १ रुग्ण असे एकुण २७ डेंग्यू सदृश्य रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे आरोग्य प्रशासन खडबडून जागे झाले असून सर्व वर प्रभावित गावात उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागाकडून युद्ध पातळीवर उपाययोजना सुरू करण्यात येत आहेत. यामध्ये आबेट औषधांची फवारणी करण्यात आली असून संबंधित गावातील प्रत्येक घरातील पाणीसाठ्याची कीटक शास्त्रीय सर्व्हेक्षण करून पाण्यात डासांच्या अळ्या आहेत का ? याचा शोध घेऊन त्याचे निर्मूलन करण्यात येत आहे. तसेच रुग्णाच्या परिवारातील व गावातील नागरिकांची आरोग्यसेविकेचा वतीने तापाची तपासणी करण्यात येत आहे. तसेच कोरडा दिवस पाळणे, डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी करावयाच्या उपाययोजना राबवून गावात साफसफाई, औषध फवारणी केली जात आहे. आतापर्यंत ६३ जणांचे रक्त नमुने घेण्यात आले असून तपासणीसाठी सोलापूर येथील लॅबला पाठविण्यात आले असून त्यापैकी २० नमुन्यांचा अहवाल आला असून त्यात दोन जणांना चिकन गुणिया व एक जणांस डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले असून उर्वरित १७ रक्त नमुने निगेटिव्ह निघाले आहेत. तर ४३ जणांचे रक्त नमुन्यांची अहवाल अद्याप प्रलंबीत आहे. डेंग्यू हा आजार एडिस इजिप्ती या प्रकारच्या डासामुळे होतो. घर व परिसरात स्वच्छता राखणे, गटारीची सफाई, घरातील पाण्याची टाकीची कोरड्या ठेवणे आदी स्वरूपाची काळजी घेणे गरजेचे आहे. ताप येणे, अशक्तपणा जाणविणे, चिडचिड वाढणे आदी प्राथमिक लक्षणे दिसून येतात. ही लक्षण जाणवल्यास हलगर्जीपणा न करता नजीकच्या दवाखान्यात जाऊन डॉक्टराचा सल्ला घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. 

उमरगा तालुक्यात व उमरगा शहरात डेंग्यूसदृश्य रुग्ण संख्येत होणारी वाढ पाहून अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवकुमार हलकुडे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. एम आर पांचाळ यांनी येळी, येणेंगुर व गुंजोटी या गावास भेट देऊन उपाययोजनाची पाहणी केली तसेच उमरगा पालिकेत आरोग्य विभाग व पालिका प्रशासनाची बैठक घेत दिशानिर्देश दिले आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने उमरगा पालिकेला पत्र देऊन डेंग्यू सदृश्य रुग्ण आढळून आलेल्या परिसरात साफसफाई, डास निर्मूलन, औषध फवारणी व पाण्याचे साठे तपासणी करण्यात यावी व जनजागृती अभियान राबविण्याचे आदेश दिले आहेत.


 
Top