तुळजापूर / प्रतिनिधी

तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकाचे हरवलेले सोन्याचे ८ ग्रॅमचे गंठण पुजाऱ्यांनी परत केले. पुजारी मंडळ कार्यालयात ओळख पटवून भाविकांना सोन्याचे गंठण परत करण्यात आले.

सोलापूर जिल्ह्यातील माळकवटे येथील ईस्माइल शेख यांची बहीण रजाकबी शेख सोमवारी (दि. २८) सकाळी सातच्या सुमारास तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आल्या होत्या. यावेळी महाद्वार परिसरात तेल खरेदी करताना त्यांचे सोन्याचे गंठण खाली पडले. ही बाब गावी गेल्यानंतर शेख कुटुंबीयांच्या निदर्शनास आली. त्यांनी तत्काळ पुजारी विकास मोटे यांच्याशी संपर्क साधला. पुजारी मोटे यांनी तत्काळ तेलाच्या दुकानात जाऊन व्यापारी गौतम जमदाडे यांना विचारणा केली. यावेळी व्यावसायिक जमदाडे यांनी सोन्याचे गंठण सापडल्याचे कबूल केले. लागलीच भाविक शेख यांना पुजारी मंडळ कार्यालयात बोलावून घेऊन ओळख पटवून सोन्याचे गंठण परत करण्यात आले. यावेळी पुजारी विकास मोटे, विजय भोसले, व्यापारी गौतम जमदाडे, भाविक इस्माईल शेख, त्यांचे मित्र गिरीश थोरात, खंडू कदम, महेश पवार, दीपक निकम आदींची उपस्थिती होती.


 
Top