उस्मानाबाद / प्रतिनिधी-

“कोविड-19च्या पार्श्वभूमीवर परवानाधारक रिक्षाचालकांना एकवेळचे अर्थसहाय्य म्हणून रु. 1500/- एवढे अर्थ सहाय्य देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. याबाबत आवश्यक निधी उपलब्ध झाला आहे. रिक्षाचालकांनी थेटपणे लाभ मिळण्यासाठी ऑनलाईन प्रणालीवर आपली माहिती भरण्याचे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.

हा लाभ लाभार्थीच्या बँक खात्यामध्ये थेटपणे देण्यासाठी कार्यप्रणाली विकसीत करण्यात आली आहे.रिक्षाचालकांना कोणतेही कागदपत्र सादर न करता केवळ ऑनलाईन प्रणालीवर त्यांचा वाहन क्रमांक,अनुज्ञप्ती क्रमांक व आधार क्रमांक नोंद करावा लागणार आहे. ही माहिती संगणक प्रणालीवर प्रमाणित करण्यात येईल.

 याबाबत कार्यप्रणाली आयसीआयसीआय बँकेमार्फत विकसित करण्यात आली असून त्याबाबतची चाचणी अंतिम टप्यात असून रिक्षाचालकांना ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा www.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ज्यांचे आधार क्रमांक बँक खात्याशी जुळतील,त्यांचा लाभ त्वरित संबंधित खात्यावर जमा होणार आहे. याकरिता उस्मानाबाद जिल्ह्यामधील रिक्षा संघटना, प्रतिनिधींना ऑनलाईन अर्ज प्रक्रियेबाबत माहिती देण्यात आली आहे. सर्व रिक्षा परवाना वाहनधारक यांनी संबंधित संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

 
Top