उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  कळंब तालुक्यातील मस्सा-खंडेश्वरी शिवारात तब्बल सव्वा कोटी रुपयांचा गांजा  जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी (दि.31 मे) सायंकाळी चारच्या सुमारास करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली असून कडब्याच्या गंजीमध्ये हा गांजा दडवून ठेवला होता. पोलिसांनी या कारवाईत 47 पोती गांजा  जप्त केला आहे. पोलिस कारवाईसाठी येत असल्याचा सुगावा लागताच चार आरोपींनी पलायन केले आहे. आरोपींविरोधात कळंब पोलीस ठाण्यात एनडिपीएस अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मस्सा शिवारात कडब्याच्या गंजीत विक्रीसाठी गाज्यांची पोती ठेवली असल्याची गुप्त माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेचा मोठा फौजफाटा कारवाई करण्यासाठी मस्सा शिवाराकडे रवाना करण्यात आला. मुद्देमाल जास्त किंमतीचा असल्याने आरोपींकडून प्रतिहल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने पोलिसांनी सर्व खबरदारी घेतली होती. पोलिसांनी छापा टाकून गंजीत लपवून ठेवलेला गांजा जप्त केला. हा गांजा 47 पोत्यांमध्ये बांधून ठेवला होता. गांजाची मोजदाद केली असता त्याचे वजन 1 हजार 132 किलो 66 ग्रॅम इतके भरले. बाजारभानुसार या गांजाची किंमत सुमारे 1 कोटी 24 लाख 59 हजार 260 रुपये इतकी आहे.

दरम्यान, पोलिस येणार असल्याचा सुगावा लागताच बालाजी काळे व राजेंद्र उर्फ दादा छगन काळे (दोघे रा. मस्सा) व इतर दोघेजण फरार झाले आहेत. याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग माने यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरुन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू असून आरोपींना पकडण्यासाठी पथके तयार करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक राज तीलक रोशन, स्थानिक गुन्हे पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलंगेकर, पोलिस उपनिरीक्षक पांडुरंग माने, हेड कॉन्स्टेबल जगदाळे, अमोल चव्हाण, हुसेन सय्यद, बबन जाधवर, अविनाश मरल्लापले, चोरे, माने यांच्या पथकाने कारवाई केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आतुल पाटील करत आहे.

 
Top