उस्मानाबाद / प्रतिनिधी-

कौटुंबिक वादातून मुरूम येथील ४० वर्षीय युवकावर नऊ जणांनी तलवार व लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. युवकावर उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

माहितीनुसार महताब अजीज शेख यांच्या घरात झाकीर बागवान पती-पत्नीत भांडण लावण्याचा प्रयत्न करत होता. महताब व त्यांच्या वडीलांनी यासाठी त्याला समज दिली. तसेच पत्नीलाही समजावून सांगितले. यानंतर मेहताब यांना भेटेल तेव्हा झाकीर तुला बघून घेतो म्हणून धमकावत असे. शनिवारी रात्री झाकीर बागवान याने सोबत असलेल्या बेरडवाडी तसेच कर्नाटक राज्यातील आळंद तालुक्यातील खजुरी येथील युवकांना ‘पकडारे याला’ म्हणत आपल्या हातातील तलवारीने मेहताबवर वार केले. पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, झाकीर याच्यासोबत असलेल्या आठ जणांनी पकडून हंटर, तलवारीने मारहाण केली. याप्रकरणी मुरूम पोलिसांनी झाकीर बागवान, इब्राहिम बागवान, झाकीर अत्तार, जाफर अत्तार, इस्माईल अत्तार आदींसह एकूण नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.


 
Top