उस्मानाबाद /प्रतिनिधी - कोरोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन लागू करण्यात आलेला आहे. त्यानुसार रिक्षा चालकांना राज्य सरकारच्यावतीने एकावेळेस १ हजार ५०० रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व ऑटोरिक्षा परवाना वाहनधारकांनी संबंधित संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांनी केले आहे.

ऑटोरिक्षा चालकांना आर्थिक मदत देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती. त्यानुसार देण्यात येणारी आर्थिक मदत लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये  देण्यासाठी कार्यप्रणाली विकसित करण्याचे निर्देश देण्यात आले होते. ती माहिती संगणक प्रणालीवर प्रमाणित करण्यासाठी कार्यप्रणाली आयसीआयसीआय बँकेमार्फत विकसित करण्यात आली असून त्याबाबतची चाचणी अंतिम टप्प्यात आहे. यासाठी रिक्षाचालकांना ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा www.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे रिक्षाचालकांनी कोणतेही कागदपत्र सादर न करता केवळ ऑनलाईन प्रणालीवर त्यांचा वाहन क्रमांक, अनुज्ञप्ती क्रमांक व आधार क्रमांक नोंद करावा लागणार आहे. त्यामुळे ज्यांचे आधार क्रमांक बँक खात्याशी जुळतील त्यांचा लाभ त्वरित संबंधित खात्यावर जमा होणार आहे. यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यांमधील रिक्षा संघटना प्रतिनिधींना अर्ज प्रक्रियेबाबत ऑनलाइन सादरीकरण दि. २१ मे रोजी करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व ॲटोरिक्षा परवानाधारकांनी  संबंधित संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांनी केले आहे.

 
Top