जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम २०२० मधील पीक विम्या देण्यात यावा यासाठी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आ.कैलास पाटील यांनी राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे व कृषी सचिव एकनाथ डवले यांची दि.२४ मे रोजी भेट घेऊन मुंबई येथील मंत्रालयातील दालनात चर्चा केली.
प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम-२०२० अंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यातील १४ लाख ५३ हजार ५४० शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेचा हप्त्यापोटी शेतकरी, राज्यशासन व केंद्र शासनाने मिळून १ हजार ११२ कोटी रुपये भरले आहेत.
राज्यासह उस्मानाबाद जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांच्या नुकसान भरपाईपोटी १३ लाख ११ हजार ४२० शेतकरी पीक विम्यापासून वंचित असल्यामुळे या शेतकऱ्यांना पीक विमा देण्यासंदर्भात दि. १३ फेब्रुवारी २०२१ रोजी लोकसभेच्या सर्वोच्च सभागृहाचे लक्ष वेधले. तसेच सातत्याने केंद्रीय कृषिमंत्र्यांना फोन व निवेदनाद्वारे खा. राजेनिंबाळकर यांनी विनंती केली आहे.
तर आ. कैलास पाटील यांनी दि.५ मार्च २०२१ रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नांला मंत्री भुसे यांनी उत्तर देताना राज्याच्या महसूल व कृषी विभागामार्फत केलेल्या पिकांच्या नुकसानीचे संयुक्त पंचनामे झाले ते ग्राह्य धरून शेतकऱ्यांना पिक विमा देण्यासंदर्भात पीक विमा कंपनीस भाग पाडू असे आश्वासन दिले होते. राज्य शासनाच्या कृषी आयुक्तांनी पीक विमा कंपनीस पत्र व्यवहार करून सूचना केल्या होत्या. मात्र त्यानंतर देखील विमा कंपनीने विमा परतावा दिला नाही. त्यामुळे राज्य शासनाने विमा कंपनीवर दबाव वाढवावा व शेतकऱ्यांना पीक विमा देण्या संदर्भात कठोर पावले उचलावित यासाठी दि.२४ मे रोजी महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे व कृषी सचिव एकनाथ डवले यांची मुंबई येथील मंत्रालय दालनात भेट घेऊन विनंती केली. यावेळी मंत्री भुसे यांनी राज्य शासन सातत्याने पीक विमा कंपनीकडे विमा मिळण्यासंदर्भात पाठपुरावा करत आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत नाहीत. तोपर्यंत राज्य शासन पाठपुरावा करत राहणार असल्याचे आश्वासन दिले. यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यासाठी ज्या अडीअडचणी येत आहेत. त्यासाठी सोडविण्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी पाठपुरावा करीत असल्यामुळे शेतकऱ्यांना लवकरच विम्याची रक्कम मिळेल अशी आशा निर्माण झाले आहे.
