धाराशिव (प्रतिनिधी)- जिओ और जीने दो, भगवान महावीरजीके तत्त्वोंकी यही पुकार, युद्ध को दो अभी विराम अशा घोषणांच्या निनादात भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त सकल जैन समाजाच्या वतीने धाराशिव शहरात सोमवारी शानदार शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी एकात्मता जोपासण्याचा संदेश देत लहान मुलांनी सादर केलेल्या नृत्याने शहरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
सकल जैन समाजाच्या वतीने जिल्ह्यात विविध ठिकाणी सोमवारी महावीर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. धाराशिव शहरातील माऊली चौकात असलेल्या 1008 भगवान पार्श्वनाथ सैतवाल दिगंबर जैन मंदिरासमोरून पारंपारिक पद्धतीने शोभायात्रा काढण्यात आली. सुरुवातीला नगराध्यक्ष नेहाताई काकडे, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक राहुल काकडे,सतिश कदम, वैशाली मुंडे, रवि मुंडे,पंकज पाटील, तुषार निंबाळकर आदींच्या हस्ते भगवान महावीर यांच्यातील तैलचित्राचे पूजन करून शोभा यात्रेला सुरुवात करण्यात आली. शोभायात्रा गुजर गल्ली जैन मंदिर, मारवाडी गल्ली, सावरकर चौक, शहर पोलीस स्टेशन, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, काळा मारुती रोड, निंबाळकर गल्ली मार्गे फिरवण्यात आली. नंतर मंदिराजवळ शोभायत्रेचा समारोप करण्यात आला. यावेळी शहरात विविध ठिकाणी फुले उधळून शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. यासोबतच शहरात विविध ठिकाणी रांगोळी काढण्यात आली. शोभायात्रेत असलेल्या पालखीचे पादप्रच्छालन व पूजन करण्यात येत होते.
भगवान महावीरजीके तत्त्वोंकी यही पुकार, युद्ध को दो अभी विराम, जिओ और जिने दो, अहिंसा परमो धर्म की जय, भगवान महावीर की जय, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने श्वेत वस्त्र परिधान करून पुरुष श्रावक आणि लाल साडी परिधान करून महिला श्राविका रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अतुल अजमेरा,अमित गांधी,प्रशांत येणेगूरे,अतुल कांबळे, मनोज कोचेटा, मनोज चाकवते, सुदेश फडकुले, सुहास हिंदानेआदींनी पुढाकार घेतला.
लहान मुलांचे मनभावन नृत्य
रॅलीच्या सुरुवातीला व अधून मधून लहान मुलांनी भगवान महावीर यांनी एकतेचा संदेश कसा दिला आहे याबद्दल नृत्य सादर करून शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. यामध्ये त्यांनी जैन तत्वावर आधारित गीतावर नृत्य सादर केले. यासाठी प्रिया कांबळे, वंदना गांधी यांनी चिमुकल्यांना मार्गदर्शन केले. सुकन्या चाकवते, राजवीर चाकवते, पिहू चाकवते, श्रीशा चाकवते, चाकवते, ओवी पलसे, स्वानंदी फडकुले,मोक्षा पलसे चिमुकले या उपक्रमात सहभागी झाले होते.