तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील पीएमश्री जिल्हा परिषद उर्दू शाळेची शैक्षणिक सहल कोल्हापूर दर्शन करत संपन्न झाली. सालाबाद प्रमाणे यावर्षीही पीएमश्री योजनेअंतर्गत 40 विद्यार्थ्यांसाठी सदर सहलीचे आयोजन करण्यात आले होते. सहलीसाठी परवानगीच्या सर्व बाबी आटोपून राज्य परिवहन महामंडळाच्या एस.टी.बसने 24 मार्च 2026 रोजी तेर येथून रात्री प्रस्थान करत कोल्हापूर दर्शनासाठी सहल निघाली. धाराशिव , सोलापूर मार्गे सकाळी कोल्हापूर येथे पोहोचत छत्रपती शाहू महाराज यांच्याद्वारे स्थापन केल्या गेलेल्या मुस्लिम बोर्डिंग येथे विश्रांती घेण्यात आली. सकाळी कनेरी मठ येथील सिद्धगिरी गार्डन, माया महाल , तारा मंडल आणि ग्रामीण बलुतेदारी देखाव्यांचे म्युझियम इत्यादी बाबी विद्यार्थ्यांना दाखवण्यात आल्या. या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्राचीन संस्कृतीचा प्रत्यक्ष अनुभव देखाव्यातून घेता आला. विद्यार्थ्यांचे आनंद द्विगुणित झाले. दुपारी शहराकडे प्रस्थान करण्यात आले. शहरांमध्ये विद्यार्थ्यांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून विद्यार्थ्यांनी चिकन बिर्याणीचा आस्वाद घेतला. दुपारी वाजता छत्रपती शाहू महाराज पॅलेस, शालिनी पॅलेस आणि वस्तुसंग्रहालयास भेट देऊन ऐतिहासिक वास्तू प्रत्यक्ष पाहण्याचा योग विद्यार्थ्यांना लाभला. संग्रहालयात विद्यार्थ्यांनी प्राचीन हत्यारे, दैनंदिन उपयोगातील वस्तू , प्राणी, पक्षांचे देखावे , दाग-दागिने, युद्धात वापरली जाणारी पोशाखे इत्यादी बाबी प्रत्यक्ष पाहिल्या. यामुळे ऐतिहासिक जीवन आणि राजे-महाराजे यांच्या दैनंदिन जीवनशैलीचे दर्शन घडले. छत्रपती शाहू महाराजांच्या पॅलेस मधील त्यांचा दरबार हॉल पाहून त्याची भव्यता विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवली. अशाप्रकारे कोल्हापूर दर्शनाची सहल पूर्ण करत सायंकाळी कोल्हापुर येथून परतीच्या प्रवासाकडे प्रस्थान करण्यात आले. प्रवासादरम्यान विद्यार्थ्यांनी कोल्हापूरी भडंग चिवडा व चहाचा आस्वाद घेतला. अत्यंत आनंददायी वातावरणामध्ये विद्यार्थ्यांची सहल कोल्हापूर येथून सुखरूप तेर येथे रात्री पोहोचली. या सहलीसाठी शाळेचे मुख्याध्यापक शहा तय्यबअली यांनी नियोजनबद्ध आखणी करून सहल यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. तर तौफिकुलआलम फुलमामडी , खतीब मुमताज , शेख शबाना आणि डॉ.शेख मौला यांनी सहकार्य केले. एस.टी.महामंडळा तर्फे सहलीसाठी चालक म्हणून उपळा येथील सरवदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांनी विद्यार्थ्यांना सुखरूप ने आण केल्याबद्दल शाळेतर्फे त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. अशाप्रकारे शाळेची शैक्षणिक सहल यशस्वी रीत्या संपन्न झाली.
