उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

प्रवासाचे बोगस ई-पास बनवणाऱ्या तिघांना पोलिस अधीक्षक कार्यालयातील आयटी सेल (उस्मानाबाद) व कळंब पोलीसांनी संयुक्त कारवाई करून ताब्यात घेतले. ही साखळी जिल्हाभर बोगस ई-पास बनवून देत असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

मागील काही दिवसांपासून प्रवासाचे बोगस ई-पास तयार करुन नागरिकांची फसवणूक होत असल्याची चर्चा सुरू होती. १७ मे रोजी गोपनीय माहितीच्या आधारे कळंब येथे बनावट ई-पास तयार करून देत असल्याची माहिती आयटी सेल यांना मिळाली होती. त्यावरून पोलीस अधीक्षक कार्यालयातील आयटी सेलमार्फत याची शहानिशा करण्यात आली. कळंब येथील श्रीकांत शिवाजी कवडे (रा. कन्हेरवाडी) हा त्याच्या मोबाईल वरून बनावट ई-पास बनविण्यासाठी ग्राहकांचे आधार कार्ड, फोटो व इतर माहिती तसेच १२०० रुपये प्रतिपास, असे घेऊन तो उस्मानाबाद येथे असलेल्या महादेव दत्तू राजगुरू यास देत होता. महादेव राजगुरू हा त्याच्याकडे प्राप्त कागदपत्रे विजय भागवत शिरसाट (रा. सांजा रोड उस्मानाबाद) त्याच्याकडे ई-पास बनविण्यासाठी देत होता. विजय शिरसाट हा त्याच्या संगणकावर बनावटीकरण करून बनावट ई-पास तयार करून ग्राहकांना देत असल्याचे उघड झाले. आयटी सेलचे अमोल गणेश यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदरील तिघांविरुद्ध कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील आरोपींना कळंब न्यायालयासमोर हजर केले असता २१ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अधिक तपास पोलीस निरीक्षक तानाजी दराडे करत आहेत.

 
Top