उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

येडशी (ता. उस्मानाबाद) येथे वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉ. रवींद्र केशव वरपे यांचा मृतदेह त्यांच्याच पेटलेल्या कारमध्ये आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. उस्मानाबाद जवळील तुळजापूर रोडवर ग्रीनलँड शाळेच्या बाजूला बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास हा प्रकार समोर आल्यानंतर नागरिकांनी पोलिसांना संपर्क साधला. सदरील डॉक्टर उस्मानाबाद शहरातील आनंद नगर भागात वास्तव्यास होते. त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबद्दलचा तपास पोलिस करत आहेत.

मूळचे बावी (ता.वाशी) येथील डॉ. रवींद्र केशव वरपे ते येडशीमध्ये वैद्यकीय व्यवसाय करत होते. मात्र गेल्या ४ महिन्यांपासून ते येडशीला गेलेच नव्हते. बुधवारी सकाळी ९ वाजता ते घरातून निघून गेले होते. त्यांनी माेबाईलही सोबत नेला नव्हता. त्यामुळे त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबद्दलचे निश्चित कारण पोलिसांना सांगता येत नव्हते. तुळजापूर रोडलगत मोकळ्या जागेत त्यांच्या क्रिएटा गाडीला आग लागल्याचे वाहनधारकांच्या लक्षात आले. नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर पोलिसांनी शोध घेतला. तेव्हा डॉ. वरपे यांचा मृतदेह कारमध्येच जळालेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समोर आलेले नसले तरी पोलिसांच्या माहितीनुसार ते कर्जबाजारी झाले होते. त्यातून ते नैराश्यात होते, सकाळी कुटुंबातील व्यक्तींना न सांगता ते घराबाहेर पडले होते. याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

 
Top