वाशी तालुक्यातील दरोडा प्रकरणात अटक केलेल्या आरोपीकडून आणखी दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. या दुचाकी उस्मानाबाद व बीड येथून त्याने चोरल्या असल्याचे निष्पन्न झाले आहे.
वाशी येथील दरोडा, चोरी अशा तीन गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अनुज गणेश भोसले (रा. डोकेवाडी, ता. भूम) यास मुद्देमालासह शनिवारी अटक केली. तो सध्या पोलिस कोठडीत आहे. कोठडीत भोसलेला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने दुचाकी चाेरीची कबुली दिली. तसेच पुढील तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखालील पोलिस उपनिरिक्षक पांडुरंग माने, हवालदार घुगे, हुसेन सय्यद, बबन जाधवर, आरसेवाड यांच्या पथकानेही अनुज भोसले याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने उस्मानाबाद व बीड जिल्ह्यातून प्रत्येकी दुचाकी चोरल्याचे दिसून आले. याप्रकरणी वाशी व नेकनूर येथे गुन्हे दाखल असल्याचे समजले. यावरुन पथकाने गुन्ह्यातील दोन्ही दुचाकी त्याच्या ताब्यातून जप्त केल्या आहेत.
