उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

उस्मानाबाद, नगर जिल्ह्यातून दुचाकी, ट्रॅक्टर चोरणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने पकडले. त्यांच्याकडून वाहने जप्त करण्यात आली आहेत.

तुळजापूर पोलिस ठाण्यात काही दिवसांपूर्वी दुचाकी चोरी संबंधी गुन्हा दाखल झाला होता. सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज निलंगेकर, हवालदार काझी, धनंजय कवडे, बलदेव ठाकुर यांच्या पथकास गोपनीय माहिती मिळाली की, संबंधित चोरीतील दुचाकी तुळजापूरच्या जिजामाता नगर येथील अभिजित नागनाथ शिंदे हा वापरत आहे. यावरुन पथकाने त्याला अटक केली. दुसऱ्या घटनेत लोहारा तालुक्यातून चोरीस गेलेल्या ट्रॅक्टरचा पोलिस उपनिरीक्षक पांडुरंग माने, हवालदार धनंजय कवडे, हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, आरसेवाड यांचे पथक शोध घेत होते. तेव्हा लोहारा (खु.) येथील रहिवासी हनुमंत भरत रसाळ, आकाश किसन कांबळे या दोघांना ट्रॅक्टर व चोरी करण्यासाठी वापरलेल्या दुचाकीसह अटक केली. त्यांच्या ताब्यातील अन्य एका बुलेट दुचाकीविषयी विचारपुस केल्यावर समाधानकारक उत्तरे दिली नाही. पथकाने चेसीस व इंजिन क्रमांकावरुन तपास केल्यावर ती दुचाकी नगर जिल्ह्यातून चोरीस गेल्यावरुन संगमनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे समजले. यावरून त्यांना अटक केली आहे.

 
Top