उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

जिल्ह्यातील रुग्णांचा वाढता मृत्युदर, विशेषज्ञांची कमतरता व आयसीयू मधील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन टेली आयसीयू सुविधा पुनः कार्यान्वित करण्याची मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जिल्हाधिकारी श्री कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे केली आहे.

गतवर्षी कोविड १९ च्या पहिल्या लाटेच्या दरम्यान रुग्णांसाठी क्लाऊड फिजिशियन हेल्थकेअर या कंपनीच्या माध्यमातून व सीएसआर च्या मदतीने जिल्हा सामान्य रूग्णालयात टेली-आयसीयू सुविधा कार्यान्वित केली होती. या माध्यमातून  आयसीयू मधील प्रत्येक रुग्णांची २४ तास निगराणी केली जात होती व  तज्ञ डॉक्टर्स कडून उपचाराची कार्यप्रणाली ठरवून त्याप्रमाणे इलाज केला जात  होता. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे तज्ञांना  देशातील विविध शहरात बसून देखील रुग्णांची देखरेख व इलाज करणे शक्य होते. या सुविधेचा मोठा फायदा झाला होता व सीएसआर च्या निधीमुळे शासनावर कोणताही आर्थिक भार पडला नव्हता.

आजची परीस्थिती पाहता आयसीयू मधील रुग्णांची संख्या ६० पेक्षा जास्त आहे. ऑक्सिजन सुविधेचे  बेड आणि व्हेंटीलेटर कमी पडत आहेत तसेच तज्ञ डॉक्टरांची संख्या मर्यादीत असल्यामुळे रुग्णांचे आयसीयु मध्ये इलाज करत असताना निगराणी राखण्यात व वेळेवर औषधोपचार करण्यात मर्यादा येत आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण ३६६६५ नागरिक कोवीड-१९  विषाणू बाधित झाले असून जिल्ह्यातील एकूण दुर्दैवी मृतांची संख्या ८८५ (२८.०४.२०२१ ची आकडेवारी)  वर पोहोंचली आहे. हा २.३२% मृत्युदर खूप चिंताजनक असून राज्याच्या सरासरी मृत्यू दरापेक्षा अधिक आहे. 

सरकारी रुग्णालयातील ४०० पेक्षा जास्त उपचाराधीन रुग्णांच्या उपचारासाठी केवळ २ भीषक (MD, Medicine) व २ भूल तज्ञ (MD. Anaesthesia) असे विशेषज्ञ असल्यामुळे टेली मेडिसिनचा वापर अनिवार्य वाटतो.

त्यामुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष  म्हणून आपण सर्व संबंधितांशी चर्चा करून जिल्हा सामान्य रुग्णालयात तातडीने टेली आयसीयु कार्यप्रणाली पुनश्च: कार्यान्वित करण्याची मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जिल्हाधिकारी श्री कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे केली आहे

 
Top