तेरणा साखर कारखाना दीर्घ मुदतीने भाडेतत्वावर चालविण्यासाठी देण्याकरिता भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे आवश्यक नाहरकत प्रमाणपत्र प्राप्त करण्याच्या अनुषंगाने तीन महिन्यांच्या आत निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचे हमी पत्र मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे देणे बाबत आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी जिल्हा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक श्री. घोणसे पाटील यांना सूचित केले होते. त्यानुषंगाने हमीपत्र सादर करण्यात आले असून,शुक्रवारी म्हणजे २३ एप्रिलला होणाऱ्या सुनावणीमध्ये उच्च न्यायालयाकडून सकारात्मक आदेश प्राप्त होऊन तेरणा कारखान्याच्या सभासदांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केली आहे.
आमदार राणा पाटील यांनी म्हटले आहे की, भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने कर्मचारी भविष्य निर्वाह निधीची रक्कम थकीत असल्याने तेरणा कारखाना सील केलेला आहे. त्यामुळे या कार्यालयाच्या संमतीशिवाय कारखाना दीर्घ मुदतीने भाडेतत्वावर चालविण्यास देण्याची निविदा काढता येत नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून कामगार व रोजगारमंत्री संतोष गंगवार यांच्याशी संपर्क साधून यातून मार्ग काढण्याची विनंती केली होती. तसेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. कारखाने भाडे तत्वावर दिल्यानंतर येणाऱ्या अनामत ठेवीतून प्रथम कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे देणे देण्याच्या अटीवर कारखाना भाडे तत्वावर देण्याच्या प्रस्तावास कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने सहमती द्यावी, अशी विनंती केली होती. सदरील प्रकरण उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ठ असल्याने जिल्हा बँक व कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालय यांच्यात परस्पर सहमतीने तडजोडीचे मुद्दे दाखल करुन सर्व न्यायालयीन बाबींची पुर्तता करण्याचे ठरले होते व तशा हमीपत्रासह प्रस्ताव भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे सादर करण्याच्या सूचना तत्कालीन जिल्हा बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकांना दिल्या होत्या.
यानुषंगाने जिल्हा बँकेकडून प्रस्ताव सादर करण्यात आला. यास सकारात्मक प्रतिसाद देत भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने तीन महिन्यात निविदा प्रक्रिया पूर्ण करू, असे सुस्पष्ट प्रतिज्ञापत्र देण्याचे सूचित केले होते. त्याप्रमाणे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जिल्हा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक यांना तीन महिन्यात बाकी देण्याचे हमीपत्र देण्याचे सूचित केले होते.