उस्मानाबाद / प्रतिनिधी-
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना व सारीच्या आजाराने अक्षरशः थैमान घातले असून वैद्यकीय आणीबाणीची स्थिती आलेली असतानाही सरकार व लोकप्रतिनिधी मात्र जनतेला वाऱ्यावर सोडून गप्प आहेत. उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयासह सर्व खासगी रुग्णालयातील मेडिकलमधील रेमडीसिवीर इंजेक्शनचा साठा संपला असून जिल्ह्यात एकही इंजेक्शन शिल्लक नाही अशी माहिती जिल्हा प्रशासनाने कळविली आहे.  आज फाक्त 96 इंजेक्शन उपलब्ध झाले होते ते पुर्ण जिल्ह्यात  वाटप केल्याचे प्रशासनाने सांगितले  मंगळवार पर्यंत आवश्यक  तेवढे इंजेक्शन उपलब्ध होतील असे प्रशासना तर्फे सांगण्यात आले.
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना लसीसाठी असलेल्या कोवॅक्सिन व कोविशील्ड या २ लसीचा एकही डोस शिल्लक नसून हाही साठा संपला आहे त्यामुळे लसीकरण मोहीम चक्क बंद करण्यात आली आहे. उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयातील १७ ऑक्सिजन बेड वगळता सर्व रुग्णालये फुल्ल झाली असून रुग्ण व त्यांचे नातेवाईक जीवन मरणाची लढाई लढत असताना सरकार मात्र उस्मानाबादकडे दुर्लक्ष करीत आहे. 
उस्मानाबाद जिल्ह्यात शिवसेनेचे खासदार, ३ आमदार असतानाही उस्मानाबाद जिल्ह्याला दुर्लक्षित केले जात असून लोकप्रतिनिधी मात्र गप्प आहेत, जालना येथून ५०० रेमडीसिवीर इंजेक्शन उस्मानाबादला देण्यात येणार होते मात्र राजकीय वजन कमी पडल्याने व इतर कारणाने ते आले नाहीत तर १० हजार इंजेक्शनचीहि स्थिती तशीच आहे. उस्मानाबाद जिल्हयात कोरोनाने थैमान घातलेले असतानाच आता सारी या आजाराने ही हल्ला केला असून शासकीय आकडेवारीनुसार काल उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात एका दिवसात सारीने तब्बल ९ जणांचा तर कोरोनाने २३ जणांचा बळी घेतला. सारीने थैमान घातले असताना याबाबत नेमक्या काय उपाययोजना कराव्यात , काळजी कशी घ्यावी , लक्षणे कोणती याबाबत आरोग्य यंत्रणेने कोणतीही जनजागृती केलेली दिसत नाही. सारीचा वाढता प्रसार होईपर्यंत आरोग्य यंत्रणा झोप काढत होती का ? हा प्रश्न विचारला जात आहे. सारीसाठी स्वतंत्र वॉर्ड व तपासणी यंत्रणा व उपचार कार्यप्रणाली राबविण्याची मागणी होत आहे. 
उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या 5696 ऍक्टिव्ह रुग्ण असून 1 लाख 84 हजार 449 नमुने तपासले त्यापैकी 28 हजार 424 रुग्ण सापडले आहेत त्यामुळे रुग्ण सापडण्याच दर 21.67 टक्के आहे. 22 हजार 037 रुग्ण बरे झाले असून 78.82 टक्के रुग्ण बरे होण्याचा दर आहे, ६९१ रुग्णांचा मृत्यू झाला असून 2.37 टक्के मृत्यू दर आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात आजवर ९४ हजार ८१४ जणांना कोरोना लसीचा पहिला डोस दिला आहे तर ११ हजार ८०१ जणांना दुसरा डोस दिला आहे मात्र लस संपल्याने १५३ ठिकाणी सुरु असलेली लसीकरणाची मोहीम बंद पडली आहे. दररोज लस लागणार हे माहित असतानाही त्याचे नियोजन करण्यात आले नाही असेच दिसते. रुग्णांची संख्या व मृत्यूची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना बेड मिळवण्यासाठी भल्या भल्या लोकांची मोठी कसरत होत आहे तर काळ्या बाजारात रेमडीसीवीर 12 ते 15 हजार रुपयांना आणले जात असल्याचे अनेक नातेवाईक सांगत आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयात व खासगी रुग्णालयात ऑक्सिजन बेड उपलब्ध नसून ऑक्सिजन सिलेंडरसाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
कोरोनाचे संकट हे जागतिक असून असे संकट यापूर्वी कधी न आल्याने वैद्यकीय क्षेत्र आहे त्या सुविधांत उपचार करीत आहे त्यामुळे त्यांच्यावर कोणी टीका करीत नाही मात्र त्याचा गैरफायदा काही मंडळी घेत असून मनमानी कारभार करीत आहेत हेही तितकेच खरे आहे. नियोजन व समन्वयाचा अभाव असल्याने उस्मानाबाद जिल्हयातील नियोजन कोलमडले आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात पॅरॅसिटेमॉल व कॅल्शियम वगळता कोरोनाच्या इतर सर्व गोळ्या या रुग्णांना बाहेरून आणाव्या लागतात. कोरोनाच्या दुसऱ्या संभाव्य लाटेची कल्पना असतानाही व तसे लेखी आदेश असतानाही नियोजन केले नाही. उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांनी आता निष्काळजी व कामचुकार करणाऱ्या  अधिकाऱ्यांना जाब विचारुन कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे


 
Top