उस्मानाबाद  / प्रतिनिधी  

कोरोना काळात मोफत वाटप केलेल्या धान्याचे बिल काढण्यासाठी रेशन दुकानदाराकडून ६७०० रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या कळंबच्या नायब तहसीलदारांसह (पुरवठा) तिघांना लाचलुचतप प्रतिबंधक पथकाने सोमवारी (दि.२२) अटक केली. ही कारवाई कळंबमध्ये करण्यात आली.

तक्रारदार स्वस्त धान्य दुकानदार असून,त्यांनी लॉकडाउन काळात मोफत धान्य वाटप केले होते. त्याचे प्रत्येकी एक क्विंटलमागे १५० रुपयांप्रमाणे शासनाकडून बिल मिळते. दुकानदाराचे मागील तीन महिन्याचे ४४ हजार ६२३ रुपये बिल काढून देण्यासाठी कोथळा (ता. कळंब) येथील स्वस्त धान्य दुकानदार व संघटनेचा अध्यक्ष श्रीरंग साधू डोंगरे (६४), दुसरा पाथर्डी येथील दुकानदार विलास ज्ञानोबा पिंगळे (५५) व कळंबच्या पुरवठा विभागाच्या नायब तहसीलदार परविन उमर दराज खान पठाण(४७)यांनी दुकानदाराला बिलाच्या रकमेचे १५ टक्के ६६९३ रुपये लाचेची मागणी केली होती.

आरोपीने डोंगरे याच्यामार्फत पंचांसमक्ष ६७०० रुपयांची लाच स्विकारली. याप्रकरणी कळंब पोलिसात गुन्हा नोंद झाला. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ.राहुल खाडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अनिता जमादार, पोलिस उपअधीक्षक प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गौरीशंकर पाबळे यांनी केली.

 
Top