उस्मानाबाद  / प्रतिनिधी

कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी मार्च २०२० पासून रद्द केलेली हैद्राबाद-पुणे रेल्वे गाडी येत्या १ एिप्रलपासून हैद्राबाद-हडपसर या नव्या स्वरूपात व नव्या वेळापत्रकाप्रमाणे सुरू होणार होती. परंतू वेळापत्रक सोईचे नाही, ट्रॉक उपलब्ध नाही अशा दक्षिण व मध्य रेल्वेच्या बे-बनावामुळे हैद्राबाद-हडपसर गाडी रद्द करण्यात आली आहे. 

 तब्बल वर्षभरापासून बंद असलेली हैदराबाद - पुणे रेल्वे हडपसर सोडण्याचे जाहीर केल्यानंतर अगदी ४८ तासांतच ही गाडी रद्द करण्याचे दक्षिण मध्य रेल्वेने जाहीर केले आहे. रेल्वे बोर्डाच्या या प्रकारामुळे लातूर, उस्मानाबादकर रेल्वे प्रवाशांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. तब्बल वर्षभर बंद असलेली ही गाडी १ एप्रिलपासून सुरू करण्याचे दक्षिण मध्य रेल्वेने जाहीर केले. वेळापत्रकाचीही पुनर्रचना करून गाडी धावण्याचे दिवसही बदलले. त्यातच गाडीचा प्रवास पुण्याऐवजी सहा किलोमीटर अलीकडे हडपसरपर्यंतच मर्यादित केला. तरीही उस्मानाबाद, लातूरकर प्रवाशांनी या गाडीचे स्वागत केले. केवळ ही गाडी पूर्ववत पुण्यापर्यंत सोडण्याची मागणी मात्र लावून धरली. पूर्वी धावणारी हैदराबाद-पुणे सोमवार, बुधवारी व शनिवारी उस्मानाबादेत यायची. सकाळी साडेसातला ती पुण्यासाठी निघत होती. 

दरम्यान नवीन हडपसर गाडी सहा वाजता उस्मानाबादेतून सुटणार असल्याने उस्मानाबादकरांना लवकर म्हणजे दहा वाजून पन्नास मिनिटांनी पुणे गाठणे शक्य होणार आहे. तर पुण्यातून दुपारी साडेतीनला निघालेली ही गाडी रात्री सव्वासातला उस्मानाबादेत पोचणार आहे. हैदराबादेत पहाटे साडेतीनला पोचणार आहे. या सर्व वेळा सोयीच्या असल्याने उस्मानाबादकरांतून आनंद व्यक्त होत असतानाच गुरुवारी दि. १८ मार्च रोजी दक्षिण मध्य रेल्वेने ही गाडीच रद्द केली आहे. त्यामुळे प्रवाशांतूनही नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, ही गाडी लवकरात लवकर नवीन वेळापत्रकाप्रमाणे पुण्यापर्यंत सोडण्याची मागणी होऊ लागली आहे.

बे-बनाव 

दक्षिण मध्य रेल्वे विभाग व मध्य रेल्वे विभाग यांच्यातील बे-बनावामुळेच ही गाडी रद्द झाली असल्याचे समजते. दक्षिण मध्य रेल्वे विभागाने मध्य रेल्वे विभागाला हैद्राबाद-हडपसर रेल्वे गाडीचे वेळापत्रक बदलण्यापुर्वी मध्य रेल्वेला विचारणे आवश्यक होते. परतु दक्षिण मध्य रेल्वेने न विचारल्यानेच सदर गाडी रद्द करण्याची नामुष्की या विभागावर आली आहे. मध्य रेल्वे विभागाने ईगो प्रब्लेम न ठेवता बदलत्या वेळापत्रकाप्रमाणे रेल्वे गाडी सुरू करता आली असती,पण असे न करता गाडीच रद्द करण्यात आली. उस्मानाबाद-लातूर-बार्शीच्या रेल्वे प्रवाशांच्या म्हणण्यानुसार सदर गाडी पुर्ववत हैद्रबाद-पुणे या प्रमाणेच करावी, विशेष म्हणजे हैद्राबाद-पुणे रेल्वेचे उत्पन्न वाढत असताना देखील गाडी नियमित करण्याच्या मागणीकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. 

 
Top