उस्मानाबाद/ प्रतिनिधी

 उस्मानाबादअल्पवयीन मुलीवर दुष्कर्म करून फरार झालेल्या अणदूर (ता. तुळजापूर) येथील आरोपीला बेड्या ठोकाव्यात, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने पोलिस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे.

युवा मोर्चाच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अणदूर येथील एका अल्पवयीन मुलीवर २७ जानेवारी रोजी सामूहिक दुष्कर्म करण्यात आले. अत्याचार करणारे ३० वर्षीय युवक असून, त्यापैकी २ आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्यातील १ आरोपी अद्याप फरार आहे.पीडित मुलगी व त्यांच्या कुटुंबातील सदस्य अजूनही तणावाखाली आहेत. त्यांचे जीवन अतिशय कठीण झाले आहे. सदरील फरार आरोपीस पोलिस प्रशासनाने लवकरात लवकर शोध लावून त्याला बेड्या ठोकाव्यात व पीडितेला न्याय मिळवून द्यावा, अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चाच्या युवती पदाधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.जिल्ह्यांतर्गत अल्पवयीन मुलीवर तसेच महिलांवर गेल्या काही दिवसापासून अन्याय व अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याकडे पोलिस प्रशासनाचे लक्ष नाही. त्यामुळे सामान्य लोकांमध्ये पोलिस प्रशासनाच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महाराष्ट्र शासनाने शक्ती कायदा कागदोपत्री मान्यता दिली आहे. परंतु त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नसल्याने समाजातील वाईट प्रवृत्तीवरती अंकुश लावताना अडचणी निर्माण होत असल्याचे दिसत आहे. निवेदन देताना भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, जिल्हा उपाध्यक्षा अंजलीताई बेताळे, पुजा राठोड, देवकन्या गाढे, आशाताई लांडगे, रुपालीताई घाडगे, दीपज्योती आकोसकर आदी उपस्थित होते. 

 
Top