उस्मानाबाद/ प्रतिनिधी

जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत 2020-21 च्या जिल्हास्तरीय आराखड्यास जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना या योजनेत प्रथम प्राधान्य द्यावे, असे निर्देशही यावेळी श्री. दिवेगावकर यांनी दिले.

   जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या या बैठकीस सह अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड, या समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील कार्यकारी अभियंता दशरथ देवकर आणि या समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  जिल्ह्यातील 720 गावांपैकी ‘अ’ वर्गाची 255 गावे असून या गावात नळाद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी नळ जोडणी देणे, पंपाची क्षमता वाढविणे आणि गरज असेल तिथे पाईपलाईन टाकण्याची कामे करण्यात येणार आहेत. ‘ब’ वर्गवारीत जिल्ह्यातील 294 गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये प्रत्यक्ष ग्रामस्थास 40 ते 55 लिटर पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी पाण्याच्या स्त्रोतांचे बळकटीकरण करणे, अतिरिक्त पाण्याची टाकी उभारणे, पाईप लाईन टाकणे आदी कामे करण्यात येतील. नवीन प्रस्तावित योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 139 गावांचा समावेश केला आहे. तर जिल्ह्यात योजना नसलेल्या गावांची संख्या 32 आहे. नवीन प्रस्तावित योजनेअंतर्गत पाणी वितरणाची व्यवस्था, पाण्याची टाकी आदी नवीन कामे करण्यात येणार आहेत. या कामांसाठी अंदाजित रक्कम 81 कोटी 76 लाख 48 हजार अशी प्रस्तावित केली आहे.

  ‘अ’ वर्गवारीतील 255 गावातील पाणी पुरवठ्यासंबंधित कामांसाठी 101 कोटी 19 लाख रुपयांचा अंदाजित खर्च प्रस्तावित केला आहे. ‘ब’ वर्गावारीतील 294 गावांसाठी 157 कोटी 84 लाख 73 हजार रुपयांचा अंदाजित खर्च प्रस्तावित केला आहे. योजना नसलेल्या जिल्ह्यातील 32 गावांसाठी अंदाजित 13 कोटी 19 लाख रुपयांचा निधी प्रस्तावित केला आहे.

 या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 450 गावे, वाड्या-वस्त्यांपैकी 273 मध्ये सोलार पंप बसविण्याचे प्रस्तावित आहे. 273 व्यतिरिक्त गावे, वाड्या-वस्त्यांचा नजीकच्या गावाच्या पाणीपुरवठा योजनेत समावेश करण्यात येणार आहे. सोलार पंप योजनेसाठी 19 कोटी 11 लाख रुपयांचा निधी प्रस्तावित केला आहे. या संपूर्ण योजनेचा आराखडा 373 कोटी 10 लाख 49 हजार रुपयांचा आहे. गतवर्षात जिल्ह्यात नळजोडीचे काम उद्दिष्टापेक्षा अधिक म्हणजे एकूण 113.64 टक्के झाल्याची माहिती यावेळी श्री. दिवेगावकर यांनी दिली.

 जिल्ह्यातील गेल्या पाच वर्षांपासून टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या गावांची सां‍ख्यकी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील टंचाई विभागाने तयार केली आहे. यात गेल्या पाच वर्षापासून टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या गावांची, तसे तीन वर्षे, दोन वर्षे टँकरने पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या गावांची माहिती संकलित करण्यात आली आहे. या माहितीच्या आधारे या जलजीवन मिशनच्या आराखड्यात प्रथम पाच वर्षे टँकरने पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या गावांचा तर त्याचबरोबर चार, तीन व दोन वर्षे टंचाईत टॅकरने पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या गावांचा समावेश करावा, असे निर्देश श्री. दिवेगावकर यांनी देऊन तात्पुरत्या नळ पाणी पुरवठा योजनेतील गावांमधील पाण्याच्या स्त्रोतांची क्षमता वाढविण्याची कामेही करण्यात येऊन ही योजना कायमस्वरुपी करावी, असेही ते म्हणाले.

 
Top