बँक ऑफ महाराष्ट्र च्या ओ.टी.एस. योजनेबद्दल सर्वाधिक १०३ फोन

उस्मानाबाद  / प्रतिनिधी- 

कर्जमाफीचा लाभ आम्हाला भेटेल का? शेतरस्त्यांची प्रचंड अडचण आहे, शासनाच्या शेती संदर्भात किती योजना आहेत ? याची माहिती मिळेल का अशा विविध प्रश्नांची विचारणा करणारे २५० फोन शिवार हेल्पलाइन कडे मार्च महिन्यात धडकले आहेत.

    आत्महत्येच्या विचाराने ग्रासलेल्या शेतकऱ्यांना वेळीच बाहेर काढून त्यांच्यात नवी उमेद निर्माण करण्याचे काम शिवार हेल्पलाईन कडून केले जात आहे. साधारणपणे जून २०२० मध्ये ही हेल्पलाईन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेली आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून त्यावर तोडगा काढने व जिल्हा प्रशासनाची मदत घेऊन प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणे हे महत्त्वपूर्ण काम शिवार हेल्पलाइन मार्फत केले जाते.

  या महिन्यात आलेल्या फोन ची वर्गवारी केली तर बँक ऑफ महाराष्ट्रा च्या थकीत कर्जदारांसाठी विशेष ओ.टी.एस. योजने बद्दल सर्वाधिक १०३ फोन आले आहेत. जिल्ह्यात सुरू असलेले अतिक्रमण मुक्त शेतरस्ते अभियान व स्वतःच्या शेत रस्त्याच्या अडचणी बद्दल ५६ फोन आहेत. ट्रॅक्टर घ्यायचा आहे, विहीर घ्यायची आहे, शेळ्यांसाठी नवीन शेड मारायचे आहे अशा वेगवेगळ्या शासकीय योजना व पिकांचा सल्ला बद्दल ३५ फोन आहेत. शिवार हेल्पलाईन म्हणजे नेमके काय आहे त्याविषयी जाणून घेण्यासाठी २० जणांनी संपर्क केला आहे. महावितरण ने वीज तोडणीचा लावलेला धडाका आणि हैराण झालेले शेतकरी याचे पण ०४ फोन आहेत. पिक विमा, परीक्षा शुल्क माफी, हवामानाचा अंदाज, शासकीय अधिकाऱ्यांची अडचण, पिक कर्ज, शैक्षणिक मदतीचे आवाहन, उसाचे बिल अडकणे, जमिनीचा मावेजा न मिळणे, पी. एम. किसान चा हप्ता वेळेवर न येणे, बाजारभाव, नवीन मतदारांची नोंदणी कधी सुरू होईल? असे पण कमी अधिक प्रमाणात फोन आलेले आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन शेतकऱ्यांना मार्ग दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला असे शिवार कडून सांगण्यात आले.

उस्मानाबाद तालुक्यातून सर्वाधिक ७२ फोन

या महिन्यात तालुक्यानुसार विचार केल्यास उस्मानाबाद तालुक्यातून सर्वाधिक ७२ फोन आहेत. त्यापाठोपाठ तुळजापूर ५४, कळंब ३२,लोहारा १८, उमरगा १८, वाशी १४, भूम ०८, परंडा ०२ फोन आहेत. 

तसेच उस्मानाबाद सोडून बाहेरील ०७ जिल्ह्यातून ३१ फोन आहेत,त्यात सर्वाधिक सोलापूर १५, बिड ०५ , लातूर ०५ असे फोन आहेत. बाहेरील राज्यातून ०१ फोन आहे.

 वयोगटानुसार वर्गीकरण केले असता १५ ते २० वयोगट मध्ये ०३ फोन, २० ते ३० वयोगटात ७४ फोन, ३० ते ४० वयोगटात ७५ फोन, ४० ते ५० वयोगटात ६२ फोन तर ५० वयोगटाच्या बाहेर ३६ फोन आहेत. 

२५० पैकी ०४ महिलांनी पण संपर्क करून व्यथा मांडल्या आहेत. वेळेचा विचार केला तर दुपारी ०२ ते सायंकाळी ०६ मध्ये ७१ फोन आहेत. सकाळी १० ते दुपारी ०२ वेळेत ७० फोन आहेत. शिवार हेल्पलाइनची कार्यालयीन वेळ सकाळी १० ते सायंकाळी ०६ अशी आहे. तरी या वेळेबाहेर सुद्धा १०९ जणांनी संपर्क केला आहे. ते फोनलासुद्धा प्रतिसाद देवून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन केले गेले आहे.

 

शिवार हेल्पलाईन ला संपर्क केलेल्या शेतकऱ्यांपैकी मानसिक आरोग्याच्या दृष्टीने आत्महत्येचा विचार, तणावग्रस्त, त्रस्त शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. आत्महत्येच्या विचारात असलेल्या २२ जणांनी फोन केले होते. यात तीव्र स्वरूपाचे १२ फोन, मध्यम स्वरूपाचे १० फोन आहेत. आत्महत्येच्या विचारातून मानसिक समुपदेशन करून शेतकऱ्यांना बाहेर काढले जात आहे असे शिवार फाऊंडेशनचे प्रमुख श्री विनायक हेगाना यांनी सांगितले._ 

शेतकऱ्यांना कोणतीही अडचण आल्यास तात्काळ शिवार हेल्पलाइनला ८९५५७७१११५ संपर्क साधावा असे आवाहन शिवार फाऊंडेशन कडून करण्यात आले आहे. हेल्पलाइन सकाळी १० ते रात्री ६ पर्यंत मोफत आहे.

  यासाठी मानसिक आरोग्याबाबत मार्गदर्शनासाठी मारिवाला हेल्थ इनिशिएटिव्ह मुंबई, तपस्वी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालय उस्मानाबाद,बायर , जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस दल, कृषी विभाग व राष्ट्रीय सेवा योजना या शासकीय, अशासकीय, स्वयंसेवी अशा सर्वच संस्थाचे सहकार्य मिळत आहे.


 
Top