औरंगाबाद / वृत्तसंस्था :- 

औरंगाबाद विभागातील प्रशासकीय कार्यपध्दती, नियम व इतर शासकीय व्यवस्थेमध्ये सुलभता व पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने औरंगाबाद  विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक सोमवार, दिनांक 5 एप्रिल 2021 रोजी  दुपारी 12.30 वा. विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आली आहे.

शासन यंत्रणेतील भ्रष्टाचाराचे समुळ निर्मूलन करण्यासाठी शासन परिपत्रकान्वये विभागीय स्तरावर भ्रष्टाचार निर्मूलन समिती स्थापन करण्यात आली आहे. या बैठकीत गैरव्यवहार, विलंब, अकार्यक्षमता व इतर कारणांनी होणाऱ्या भ्रष्टाचाराबाबत जनतेच्या तक्रारी, गाऱ्याणी ऐकूण घेण्यात येतात. तसेच लेखी स्वरुपातील तक्रारी स्वीकारण्यात येतात. विशिष्ट अभिकथनाबाबत स्वतंत्रपणे स्थानिक चौकशी करण्याच्या दृष्टीने तजवीज करण्यात येते. भ्रष्टाचार कोणत्या क्षेत्रात किंवा कोणत्या ठिकाणी घडत आहे याबद्दल माहिती घेणे, त्या क्षेत्रातील किंवा त्या ठिकाणी भ्रष्टाचार निर्मूलनासाठी उपाययोजना केल्या जातात. तसेच प्रशासकीय कार्यपध्दती, नियम व इतर शासकीय व्यवस्थेमध्ये भ्रष्टाचारास वाव राहू नये व त्याचे निर्मूलन व्हावे या दृष्टीने सुलभता व पारदर्शकता आणण्याबाबत शिफारस करण्यात येते. जेणे करुन सामान्य जनतेला प्रशासकीय कार्यपध्दतीबद्दल साशंकता वाटणार नाही व जनतेची कामे सहजगत्या होतील याबाबत समितीमार्फत सूचना देण्यात येतात, असे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सदस्य सचिव तथा उपआयुक्त (महसूल) यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

 
Top