उस्मानाबाद / प्रतिनिधी:

जिल्हयात राष्ट्रीय जंतनाशक मोहिम येत्या एक ते आठ मार्च 2021 दरम्यान राबविण्यात येणार आहे.या मोहिमे अंतर्गत आपल्या एक ते 19 वर्षे वयोगटातील मुला-मुलींना जंतनाशक गोळी देऊन त्यांचा कुपोषण,रक्ताक्ष्‍ायापासून बचाव करा.त्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी सजग  पालक व्हा,असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड यांनी आज येथे केले आहे.

  राष्ट्रीय जतंनाशक मोहिमेच्या जिल्हा समन्वय समितीची बैठक डॉ.फड यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात झाली.तेव्हा ते बोलत होते.या बैठकीस अपर जिल्हाधिकारी रुपाली आवले,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एच.व्ही.वडगावे,महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एच.निपानीकर,जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ.के.के.मिटकरी,कुष्टरोगचे सहायक संचालक डॉ.रफिक अन्सारी,जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.एम.आर.पांचाळ,सांख्यिकी अधिकारी दत्तात्रय कवितके,डॉ.राजेश कुकडे,डॉ.गजानन परळीकर,शरद माळी आदी उपस्थित होते.

  जिल्हयातील चार लाख मुला-मुलींना जंतनाशक गोळी दिली जाणार आहे.जंतनाशक गोळी आपल्या मुला-मुलींना दिल्यास त्यांना रक्तक्षय होण्याची शक्यता नसते.त्यांचे आरोग्य सुधारते.बालकांची वाढ व्यवस्थित होऊन ती निरोगी राहतात.त्यांच्यात अन्य संसर्गाचा प्रतिकार करण्याची क्षमता वाढते. त्यामुळे त्यांची शाळेतील उपस्थितीचे प्रमाण वाढवण्यास मदत होऊन त्यांची शैक्षणिक प्रगती होऊ शकते.ते अधिक क्रियाशील बनतात.परिणामी मोठेपणी काम करण्याची आणि दीर्घ काळ अर्थार्जन करण्याची त्यांची क्षमता वाढते,असे सांगून डॉ.फड म्हणाले की जंतनाशक गोळी घेतलेल्या व्यक्तींना भविष्यात जंतनाशकाच्या उपचाराची आवश्यकता भासत नाही कारण त्यांच्या परिसरातील जंतांची संख्या कमी होते.आपल्या मुला-मुलींना जंताची गोळी गिळण्यास देऊ नये तर ती त्यांना चघळण्यास द्यावी किंवा त्या गोळीची बुकटी करुन द्यावी.जेणेकरुन गोळी घशात आडकून त्यांना त्रास होणार नाही,असेही डॉ.फड यांनी सांगितले.

 आरोग्य अधिकारी डॉ.वडगावे यांनी मोहिमेबाबत  करण्यात आलेल्या आयोजनाबाबत सविस्तर माहिती दिली.यामध्ये जंतापासून संसर्ग थांबविण्यासाठी हात स्वच्छ धुणे,शौचालयाचा वापर करावा,उघडयावर शौचास जावू नये ,शौचास जातांना पायात बुट अथवा चप्पलचा वापर करावा,निर्जंतूक आणि स्वच्छ पाण्यात भाज्या आणि फळे धुवावीत,नखे नियमित तसेच स्वच्छ ठेवावीत याबाबी नियमित केल्यास जंतांचा प्रादुर्भाव होणार नाही.या मोहिमेच्या पर्यवेक्षणासाठी जिल्हास्तरीय अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.ही मोहिम सर्व शासकीय शाळा,आश्रम शाळा,खाजगी अनुदानित आणि विना अनुदानीत शाळा,अंगणवाडी तसेच सर्व महाविद्यालयामध्ये राबविण्यात येणार आहे.शाळा बाहय मुला-मुलीसाठी गृहभेटीद्वारे जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे.असेही त्यांनी सांगितले.

 
Top