उस्मानाबाद/ प्रतिनिधी

तुळजापूर तालुक्यातील गंधोरा येथील फुलचंद भोसले हे एटीएममध्ये पैसे काढण्यास गेल्यानंतर हातचलाखीने त्यांचे कार्ड बदलून खात्यावरील १ लाख ८ हजार रुपयांची रक्कम लंपास करण्यात आली होती. ही घटना तुळजापूर येथे घडली होती. याप्रकरणी तपासादरम्यान सायबर पोलिसांनी सीसीटीव्हीत कैद संशयिताची माहिती काढत यातील आरोपी चंद्रशेखर प्रदीप साहनी, (मुळ रा. कटीहार- बिहार) यास अटक केली आहे.

याप्रकरणात आरोपीने फुलचंद भोसले हे तुळजापूर येथील एका एटीएम केंद्रातून रक्कम काढत असताना मदत करण्याच्या बहाण्याने त्यांचे एटीएम कार्ड हाती घेऊन हातचलाखीने त्यांना दुसरेच एटीएम कार्ड दिले होते. तसेच ते व्यवहार करत असताना त्यांचा पासवर्ड बघीतला होता. नंतर त्याने सदरील एटीएम कार्ड -पासवर्डच्या सहाय्याने विविध एटीएम केंद्रातून फुलचंद भोसले यांच्या बँक खात्यातील एकूण एक लाख ८ हजार रुपये काढले होते. याप्रकरणी तुळजापूर ठाण्यात गुन्हा नोंद होऊन तो सायबर पोलिस ठाण्याकडे वर्ग झाला होता. तपासा दरम्यान सायबर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक अर्चना पाटील यांच्यासह सपोनि दत्ता काळे, उपनिरीक्षक योगेश पवार व टीमने सीसीटीव्ही छायाचित्रणाचा अभ्यास करत असताना हा गुन्हा सध्या तुळजापूर येथे वास्तव्यास असलेला आरोपी चंद्रशेखर साहनी याने केल्याचे समोर आले. त्यानुसार दि.१७ रोजी त्यास अटक करण्यात आली.

 
Top