तुळजापूर  /प्रतिनीधी

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी नगर पालिका सरसावली असून गुरुवारी (दि. २५) शहरात मास्क न बांधणाऱ्या ४८ लोकांवर कारवाई करत ७३०० रुपये दंड वसूल करण्यात आला तर तुळजाभवानी मंदिरात मंदिर कर्मचारी व पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत ४ भाविकांकडून २ हजार रुपयांचा दंड वसूल केला.

गेल्या काही दिवसांपासून शहरासह देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने सतर्क झालेल्या प्रशासनाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी कडक उपाययोजना करण्यास सुरूवात केली आहे. यामध्ये मास्क न बांधणाऱ्यांकडून दंड वसूल करणे, गर्दीच्या ठिकाणी धाव घेऊन सोशल डिस्टन्सिंगसाठी आग्रह धरणे, सॅनिटायझेशन आदींच्या अंमलबजावणीसाठी पालिका कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. शुक्रवारी शहरातील बसस्थानक, आंबेडकर चौक, दीपक चौकसह नळदुर्ग रोडवरील सर्व बँकात कारवाई करण्यात आली. यावेळी मास्क न बांधणाऱ्या ४७ नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यावेळी ७३०० रुपये दंड वसूल करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी आशिष लोकरे यांच्यासह अभियंता अभंग गायकवाड, लेखा पाल कृष्णा काळे, अंतर्गत लेखा परीक्षक राहूल मिटकरी, संदीप जाधव, सज्जन गायकवाड आदींची उपस्थिती होती.

 तुळजाभवानी मंदिरात मंदिर कर्मचारी व पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत मास्क न बांधणाऱ्या चार भाविकांकडून दोन हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. यावेळी मंदिर संस्थानचे अभियंता राजकुमार भोसले, जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे, विश्वास कदम यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.


 
Top