कळंब ( शिवप्रसाद बियाणी

      ‘किती धावलो बाळांसाठी चुकलो आपण’

‘कुठे सांग ना स्वतःसाठी जगलो आपण’

‘रोज नव्याने जिंकत गेली बाळे आपली’

‘आयुष्याच्या संध्याकाळी हारलो आपण.’

सारिका माकोडे-भड

 अशा दर्जेदार गझल आणि कवितांनी शरदचंद्र महाविद्यालय शिराढोण आणि स्पंदन साहित्य कला,क्रीडा चॅरिटेबल फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने व मराठी विभागाच्या वतीने आयोजित केलेले मराठीतील नव्या पिढीतील कवीचे “ स्वरशब्द काळजाचा” या काव्य मैफीलीचे कवी संमेलन उत्तरोत्तर रंगत गेले.

   वास्तवाचा विसर पडू न देता कवींनी आभासी जगाचा फेरफटका मारलेला श्रोत्यांना अधिकच भावला. या संमेलनात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ख्यातनाम कवी,कवयित्रींनी निमंत्रित करण्यात आले होते. डॉ. मदन देगावकर, जीवन धेंडे, गझलकार शेखर गिरी, नवनाथ खरात, डॉ. सय्यद अकबर लाला, कवयित्री कोमल पाखरे व शरदचंद्र महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी गझलकारा माकोडे सारिका भड हे मंचावर उपस्थित होते.

   “स्वर शब्द काळजाचा” या काव्य मैफिलीची सुरुवात राजमाता लोकमाता जिजाऊ आणि स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्त्या सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजनाने करण्यात आली.बार्शी येथील डॉ. मदन देगावकर यांनी रानावनाच्या मातीच्या कवितेतून ग्रामीण साज-शृंगार चढवलेली ग्रामीण कविताने जीवन दर्शन घडवले. कवी जीवन धेंडे यांनी ‘चारचौघात मी मोजके ठेवले, दुःख माझे जरा बोलकी ठेवले’ या कवितेने रसिक मनाचा ठाव घेतला. सुप्रसिद्ध गझलकार शेखर गिरी यांनी . मी बदलुन गेलो पुरता इतकेच ठरवल्यानंतर 

माघार घ्यायची नाही स्पर्धेत उतरल्यानंतर 

मी किती वेळ घालवला समजून घ्यायला सारे

मी आग विझवली आहे आगीत झुलसल्यानंतर

प्रेमात तुझ्या असताना ते नशेत जगणे होते

मी मजेत जगतो आहे बघ तुला विसरल्यानंतर अशा प्रकारे आपल्या गझलेतून समाज व्यवस्थेवर ताशेरे ओढले. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गझलकार इलाही जमादार यांना  भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बिराजदार जे.डी. प्रमुख पाहुणे म्हणून ए.पी.आय वैभव नेटके, उपप्राचार्य साजिद चाऊस, मराठी विषयाचे विभाग प्रमुख डॉ. आत्तार अमजत, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. सय्यद अमर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. डॉ. आतार ए.एच. यांनी केले तर कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन डॉ. फारुख तांबोळी यांनी करून उपस्थितांची मने जिंकली.

 कार्यक्रमाचे आभार डॉ.सुर्यकांत दळवी यांनी केले. कार्यक्रमाला विद्यार्थी आणि शिराढोण  परिसरातील रसिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

तब्बल अडीच तास रंगलेल्या काव्य मैफिलीच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व  प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

 
Top